बीड
आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली त्रिपक्षीय करारासाठी आंदोलनाची हाक

आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली त्रिपक्षीय करारासाठी आंदोलनाची हाक
करार करा,अन्यथा गळीत हंगाम रोखू
उसतोड संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप यांचा इशारा
*****************
आ.सुरेश धस व अध्यक्ष सुखदेव सानप फोटो घ्यावा
*****************
आष्टी (प्रतिनिधी) : ऊसतोडणी व वाहतूक कामगार तसेच मुकादमांच्या हक्काच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेण्यात आली असून,
लोकनेते गोपीनाथरावजी साखर कामगार संघटनेचे संघटक आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे लोकनेते गोपीनाथरावजी साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप यांनी सांगितले. नव्याने त्रिपक्षीय करार झाल्याशिवाय राज्यातील साखर कारखान्यांचा आगामी गळीत हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ऊसतोडणी व वाहतूक कामगार आणि मुकादमांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, समाजकल्याण आयुक्त तसेच साखर संघाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना संपाची नोटीस देण्यात आली आहे.
राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगार तसेच मुकादमांच्या हक्काच्या सेवा-सुविधांबाबत २७ ऑक्टोबर २०२३ रोजी त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. तीन वर्षांसाठी करण्यात आलेल्या या कराराची मुदत २०२५-२६ च्या गळीत हंगामात संपली आहे. त्यामुळे २०२६-२७ च्या गळीत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी नव्याने त्रिपक्षीय करार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
नव्या करारात ऊसतोडणी कामगारांना प्रति टन ६०० रुपये मजुरी देण्यात यावी, वाढलेल्या डिझेल दर व वाहन देखभालीचा खर्च लक्षात घेऊन ऊस वाहतूक दरात शंभर टक्के वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये ३५ टक्के वाढ करावी, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करून ओळखपत्र व सेवापुस्तिका देण्यात यावी, मागील तीन वर्षांचा प्रति टन दहा रुपयांप्रमाणे निधी कामगार कल्याणकारी महामंडळाकडे जमा करावा, कामगारांना भविष्य निर्वाह निधीची सुविधा द्यावी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्याच चळवळीचा वारसा पुढे नेत आज आ. सुरेश धस हे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर आमच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी ही लढाई पुढे नेणार आहोत. त्रिपक्षीय करार झाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू देणार नाही,असा निर्धार
लोकनेते गोपीनाथरावजी साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप यांनी व्यक्त केला.
गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शासनाने कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्रिपक्षीय करार करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.



