युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजविकासात योगदान द्यावे : दत्तात्रय क्षीरसागर

युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजविकासात योगदान द्यावे : दत्तात्रय क्षीरसागर
शिवणी येथे तुलसी फॅशन कॉलेजच्या ‘रासेयो’ शिबिराचे उत्साहात उद्घाटन
बीड: (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते. युवकांनी समाजाच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृतीतून योगदान द्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, बीडचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले.
देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवार,दि.२७ रोजी मौजे शिवणी येथे ‘शाश्वत विकास, पाणलोट व्यवस्थापन व पडीक जमीन विकासासाठी युवा’ या थीमखाली आयोजित सातदिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रे होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश काकडे, तुलसी आय.टी. कॉलेजचे प्राचार्य प्रा.डी.जी. निकाळजे उपस्थित होते.
यावेळी प्रा.निकाळजे म्हणाले की, युवकांमध्ये देशभावना जागृत होऊन देशभक्तीतून समाजसेवा घडावी, हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश आहे. महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली असून, ही सामाजिक जाणिवेची चळवळ आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व सामाजिक बांधिलकी निर्माण करणे हे तिचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
अध्यक्षीय भाषणात डॉ.बेद्रे यांनी ‘खेड्याकडे चला’ या गांधीजींच्या विचारांची मांडणी करत ग्रामीण सक्षमीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. खेडे हा भारताचा कणा असून, ग्रामीण विकासाशिवाय शहरी प्रगती शक्य नाही. शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या कच्च्या मालामुळे देश चालतो. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व वृक्षसंवर्धनावर भर देत स्वतःपासून बदल घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वृषाली लोखंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्वेता वंजारे यांनी मानले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.सय्यद शहाणा यांचेसह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिवणी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



