📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निर्भीड पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी परमेश्वर सोळंके तर माजलगाव तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब आडागळे यांची निवड

निर्भीड पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी परमेश्वर सोळंके तर माजलगाव तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब आडागळे यांची निवड
बीड  | प्रतिनिधी
निर्भीड पत्रकार संघाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ देत बीड जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व संपादक परमेश्वर सोळंके यांची, तर माजलगाव तालुकाध्यक्षपदी पत्रकार बाळासाहेब आडागळे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे बीड जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. निर्भीड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा रुचिका मालबानी यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका, किरण डोळस, मोनिका बेद्रे, आनंद वीर व समीर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
यावेळी बीड जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर परमेश्वर सोळंके यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब आडागळे यांनी निर्भीड पत्रकार संघाची ताकद तालुक्यात वाढविण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.
बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पत्रकारांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि समाजहिताच्या पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी संघटनेने अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, संपादक देशमाने, प्रचंड सोळंके यांच्यासह अनेक पत्रकार, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निर्भीड पत्रकार संघाच्या या नव्या नियुक्त्यांमुळे बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटनात्मक बळ मिळणार असून पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Back to top button