बीड
लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये शिवसंग्रामचा स्तुत्य उपक्रम; महिलांना ‘एनएमसी’ (NMC) कार्डचे वाटप..

लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये शिवसंग्रामचा स्तुत्य उपक्रम; महिलांना ‘एनएमसी’ (NMC) कार्डचे वाटप..
डॉ. ज्योतीताई मेटे आणि युवक नेते आशुतोष भैय्या मेटे यांच्या हस्ते पोस्टमन कॉलनी येथे कार्डांचे वितरण; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
बीड (प्रतिनिधी):शिवसंग्रामचे संस्थापक लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून बीडमधील पोस्टमन कॉलनी येथे शिवसंग्रामच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि जनहितैषी उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात बहुसंख्य लाभार्थी महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘एनएमसी’ (NMC) स्मार्ट कार्डचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक आणि थेट वाटप करण्यात आले. शिवसंग्रामचे शहर संघटक हरिश्चंद्र ठोसर व महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. संगीताताई ठोसर यांच्या विशेष पुढाकारातून आणि नियोजनातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामच्या वतीने पोस्टमन कॉलनी व प्रभाग क्रमांक 1 मधील महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलत देणाऱ्या ‘एनएमसी’ कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केवळ शिबिर घेऊन न थांबता, महामंडळाकडून तयार होऊन आलेली ही स्मार्ट कार्डे थेट महिलांच्या हातात सुपूर्द करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई मेटे आणि युवक नेते आशुतोष भैय्या मेटे यांच्या शुभहस्ते या कार्डांचे वितरण करण्यात आले.
सध्या राज्य शासनाच्या वतीने महिलांना एसटी बस प्रवासात 50% सवलत दिली जाते, ज्यासाठी हे ‘एनएमसी’ स्मार्ट कार्ड अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा कागदपत्रांची पूर्तता करणे किंवा आगारात जाऊन कार्ड आणणे महिलांसाठी कठीण होते. हीच अडचण ओळखून ठोसर दांपत्याने महिलांना त्यांच्या हक्काचे कार्ड थेट दारात उपलब्ध करून दिले. या कार्डमुळे आता महिलांना सुरक्षित आणि सवलतीच्या दरात प्रवास करणे सोपे होणार असल्याने, उपस्थित महिलांनी शिवसंग्राम परिवाराचे आणि डॉ.ज्योतीताई मेटे यांचे मनापासून आभार मानले.
या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी नेहमीच समाजातील वंचित, घटकांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले. त्यांच्या जयंतीदिनी अशा प्रकारे थेट महिलांना फायदेशीर ठरणारे उपक्रम राबवणे हीच साहेबांना खरी आदरांजली आहे.शिवसंग्राम संघटना यापुढेही महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसंग्रामचे शहर संघटक हरिश्चंद्र ठोसर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. संगीताताई ठोसर, प्रभागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण परिसरातून शिवसंग्रामच्या या कृतीशील उपक्रमाचे कौतुक होत आहे.



