भटक्यांच्या पालात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पालावरील लोकांना समजले डॉ. बाबासाहेब – पोलीस निरीक्षक महेश पाटील

भटक्यांच्या पालात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पालावरील लोकांना समजले डॉ. बाबासाहेब – पोलीस निरीक्षक महेश पाटील
जामखेड (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती जामखेड शहरातील बीड रोड येथील भटक्या-विमुक्त समाजाच्या पालामध्ये विशेष उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभलेले जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले ,मागच्या काही वर्षांत भटक्या-विमुक्त समाजामध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय. पूर्वी शिक्षण, कायदा, संविधान यापासून दूर असलेला हा समाज आता जागरूक झाला आहे. आज पालांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उत्सव साजरा होताना पाहून मला विशेष अभिमान वाटतो. पाळ्यांमधील लोक आता केवळ बाबासाहेबांचे फोटो लावत नाहीत, तर त्यांचे विचार समजून घेत आहेत, अंगीकारत आहेत. म्हणूनच मी म्हणतो,आज ‘पालावरील लोकांना डॉ. बाबासाहेब समजले’ हे पाहून समाधान वाटते.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ॲड. डॉ.अरुण जाधव म्हणाले,देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाले पण इथल्या आदिवासी भटक्यांना ७८ वर्षा नंतर या समाजाला राहायला फुटभर जागा नाही, घर नाही जमीन नाही,व आभाळ पांगरणे ही अवस्था असलेल्या समाजाला आज कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळू लागले. भटके विमुक्त लिहू लागले बोलू लागले त्यांच्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरा बद्दल सन्मान वाढत आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव, कॅप्टन लक्ष्मण भोरे, नगरसेवक दिगांबर चव्हाण, प्रवक्ते बापूसाहेब ओव्हळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे,मच्छिंद्र जाधव, लेखक संतोष पवार,अरविंद जाधव,राजू शिंदे, संतोष पवार शहानुर काळे आदी भटक्या विमुक्त समाजातील युवक व माता भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण विकास केंद्र चे राजू शिंदे यांनी केले.



