दिंडोरा वाजला पण वसाहत आलीच नाही !– उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला

दिंडोरा वाजला पण वसाहत आलीच नाही !– उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला
पक्षबांधणीला नवे बळ ! जामखेड येथे राष्ट्रवादी चे संपर्क कार्यालय ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
जामखेड (प्रतिनिधी) – रोहीत आमच्यासोबत होते, तेव्हा कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. आता ते आमच्यासोबत नाहीत, म्हणून रस्ते, एसटी बसस्थानक, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी अशा अनेक समस्या तालुक्यात निर्माण झाल्या आहेत,”दिंडोरा वाजला पण वसाहत आलीच नाही. या सर्व प्रश्नांवर न्याय देण्यासाठी पुढील काळात लक्ष केंद्रित केले जाईल.असे स्पष्ट वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गुरुवारी रात्री जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रीय युवक अध्यक्ष धिरज शर्मा, राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, सचिन गायवळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, राजेंद्र गुंड, ॲड. बाळासाहेब मोरे, प्रदेश युवती अध्यक्ष संध्या सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, बेलवंडी सरपंच ऋषीकेश शेलार व श्रीगोंदा येथील असंख्य कार्यकर्ते जामखेड येथील माजी नगरसेवक राजेश वाव्हळ, शामीर सय्यद, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गणेश काळे, अजित रेडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आ. रोहीत पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, “सेल्फी काढून रस्ते होत नाहीत, विरोधात राहून निर्णय घेतले जात नाहीत. हजार मतांनी निवडून आलेल्यांनी आता काय करायचं?”
पुढे बोलताना अजित पवार यांनी राज्यातील पाणीटंचाई, सांडपाणी पुनर्वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि ऊर्जा निर्मिती यावरही भर दिला. तसेच, संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका करत, आम्हाला रोज उणीदुणी काढणाऱ्यांकडे पाहायला वेळ नाही, आम्ही आमचं काम करत आहोत,असंही ते म्हणाले.
*चौकट*
“अजित दादांचे नेतृत्व म्हणजे विश्वासाचा व विकासाचा पाठिंबा. त्यांच्या जिव्हाळ्यामुळे आज जामखेडला एक नवा आत्मविश्वास मिळालाय. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी – कुकडी कालवा योजना, एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, आणि शाश्वत पाणीपुरवठा – या सर्व बाबींमध्ये दादांचे मार्गदर्शन अत्यंत गरजेचे आहे. कर्जत-जामखेडच्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या आशीर्वादाची नितांत आवश्यकता आहे.”
*महेश निमोणकर*
तालुका अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जामखेड



