राजकीय व्हायरसवर ‘अजितदादा’ हेच योग्य औषध – आमदार रोहित पवार

राजकीय व्हायरसवर ‘अजितदादा’ हेच योग्य औषध – आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार यांचे सोशल मीडियावर पोस्ट
जामखेड | प्रतिनिधी:-काल जामखेडमध्ये झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड आणि स्पष्ट वक्त्याची भूमिका घेतली. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी मंजूर झाली असल्याचा प्रा. राम शिंदेंचा दावा त्यांनी फेटाळत, “कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी आली का? नाही आली,” या एका वाक्यात त्यांच्या दाव्याचा फुगा फोडला.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून अजितदादांचं अभिनंदन करत एक भावनिक निवेदन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाटेगाव-खंडाळा येथे एमआयडीसीसाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली होती, केवळ मंत्र्यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. ती मंजुरी दादांनी द्यावी, अशी कळकळीची मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच उपजिल्हा रुग्णालयासाठी, चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं संग्रहालय, घाट, कमानीसाठी निधी, खर्ड्यात सद्गुरु संत श्री गितेबाबा आणि सिद्धसंत श्री सितारामबाबा गडाच्या सुरु असलेल्या विकासकामासाठी निधी, जामखेडच्या आणि कर्जतच्या मी मंजूर करुन आणलेला व पूर्ण केलेल्या एसटी डेपोसाठी पुरेशा एसटी बस आणि मनुष्यबळ यासह इतर कामांसाठीही निधीची गरज आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या यंदाच्या ३०० व्या जयंतीसाठीही भरीव निधीची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. “कोणताही भेदभाव न करणारे नेते म्हणून अजितदादा यांच्याकडूनच हे शक्य आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी, मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या निधी आणि कामांना अडवण्याचा “राजकीय व्हायरस” पसरतोय, आणि त्यावर ‘दादा’ हेच एकमेव योग्य उपचार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
*प्रतिक्रिया*
एमआयडीसी कुठं आली? अजितदादांनी राम शिंदेंच्या दाव्याचा फुगा फोडला!दादा, तुमच्या एका वाक्याने जामखेडकरांचा मन जिंकलंत.
– आमदार रोहित पवार



