बीड

यशराज पंडित, शिवराज पवार या जोडीने  नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापवले

यशराज पंडित, शिवराज पवार या जोडीने
नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापवले
गेवराईत भाजपची प्रचारात आघाडी
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई नगर परिषद निवडणूकीसाठी भाजप नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि भाजपनेते बाळराजे पवार यांनी एकत्रितपणे भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी मोर्चे बांधणी केली असली तरी युवानेते यशराज पंडित आणि युवानेते शिवराज पवार या युवा नेत्याच्या जोडगोळीने गेवराईतील नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापवल्याचे दिसत आहे.
    गेवराई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व 22 नगरसेवक पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजप नेते बाळराजे पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजपा उमेदवारांच्या पॅनलची चांगलीच ताकद वाढलेली दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित या दोन्ही पंडित बंधूंनी नगरपालिकेवर आपलेच वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी कसोशीने प्रयत्न चालवले आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना एकनाथराव शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे उमेदवारही लढणार असले तरी खरी लढत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 हा शेवटचा दिवस आहे. तरीही भाजपकडून युवा नेते यशराज बदामराव पंडित आणि युवा नेते शिवराज बाळराजे पवार या दोन्ही युवानेते शहरातल्या प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल करताना हे दोघेही उपस्थित राहून उमेदवारांची बळ वाढवताना दिसत आहेत. युवा नेते शिवराज पवार यांची आई सौ गीता भाभी पवार या भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याने ते स्वतः मतदारांच्या भेटी घेऊन आशीर्वाद मागत आहेत. त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे युवा नेते यशराज पंडित यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे. त्यामुळे गेवराई शहरातल्या प्रत्येक गल्लीबोळात ते मतदारांच्या भेटीसाठी जाताना त्यांच्या समवेत युवकांचा मोठा गराडा पाहायला मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी मतदारही मोठ्या उत्साहाने त्यांना भेटून भाजप उमेदवाराला पाठिंबा देताना दिसत आहेत. एकंदरीत प्रचाराच्या सभा आणि भाषणातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा डागण्याचे काम लवकरच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होताना दिसेल. परंतु तत्पूर्वीच यशराज पंडित आणि शिवराज पवार या दोन्ही युवा नेत्याच्या जोडगोळीने गेवराईतील राजकीय वातावरण तापवायला सुरुवात केली आहे हे मात्र नक्की. या दोन्ही युवा नेत्यांच्या प्रचाराने युवा वर्ग मोठ्या संख्येने भाजपसोबत जोडल्या जात असल्याने याचा भाजपला न प निवडणुकीत चांगला फायदा होईल असे चित्र दिसत आहे.
Back to top button