
अट्टल महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न
गेवराई, दि. ९ (प्रतिनिधी):- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरणाचा समारंभ पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील माजी परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्या हस्ते पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करून समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत विद्यापीठ ध्वज घेऊन मान्यवर आणि पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून झाली. विद्यापीठाने दिलेल्या नियमावलीप्रमाणे दीपप्रज्वलन, विद्यापीठ गीताने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य मेजर विजय सांगळे यांनी केले. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पदवीचे महत्त्व सांगून पदव्युत्तर शिक्षण आणि करियर या संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने हा दुसरा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित केला होता. यानंतर डॉ. संदीप बनसोडे यांनी कला विभागाचे प्रतिनिधी म्हणून, डॉ. मधुकर वाडीकर यांनी विज्ञान विभागाचे प्रतिनिधी म्हणून तर डॉ. भारत पगारे यांनी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभागाचे प्रतिनिधी म्हणून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या नावांची उद्घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रबंधक भास्कर सुरवसे, आयक्यूएसी समन्वयक डॉ प्रवीण सोनुने यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.



