बीड
दुर्लक्षित बंजारा समाजाचे प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी राष्ट्रीय बंजारा महासंघ सक्षम पर्याय -भिकनभाऊ जाधव

दुर्लक्षित बंजारा समाजाचे प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी राष्ट्रीय बंजारा महासंघ सक्षम पर्याय -भिकनभाऊ जाधव
बीड (प्रतिनिधी) स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्षे होत आली तरी महाराष्ट्र आणि देशातील बंजारा समाजाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय न्याय मिळालेला नाही, ही बंजारा समाजावर प्रचंड अन्याय करणारी गोष्ट असून अनेक प्रश्न बंजारा समाजाला भेडसावत आहे,अशा प्रलंबित व जिव्हाळ्याच्या शेकडो प्रश्नांना प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व सरकार दरबारी या समस्या मांडण्यासाठी व बंजारा समाजाला मान सन्मान व सत्तेतील वाटा मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून टोकाचं संघर्ष करण्यासाठी बंजारा समाजासमोर एक सक्षम पर्याय म्हणून राष्ट्रीय बंजारा महासंघाची स्थापना आज विश्व गोर बंजारा दिनाच्या शुभ दिनी करण्यात आली आहे,असे मत राष्ट्रीय बंजारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकनभाऊ जाधव यांनी मांडले.राष्ट्रीय बंजारा महासंघ या लढवय्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या सामाजिक संघटनेच्या निमित्ताने बीड येथे आयोजित स्थापना सोहळ्यात उपस्थित समाज बांधवांना ते संबोधित करीत होते.
जगण्यासाठी मरण यातना भोगणारा बंजारा समाज, पोटाची खळगी भरण्यासाठी जंगल दरी खोऱ्यात भटकंती करणारा,सहा महिने कारखान्याच्या उसाच्या फडात प्रचंड मेहनत करणारा परंतु पदरी कायम निराशा निराशा आलेला बंजारा समाज अनेक अर्थाने दाबला गेला, हक्क व न्याया पासून दुर्लक्षित व वंचित राहिला आहे.बंजारा समाजाचा व्यथा व वेदना सरकारला माहित नाही,म्हणून अनेक क्षेत्रात बंजारा समाजाची पिछेहाट होत आहे.सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय क्षेत्रात बंजारा समाजाला नगण्य वाटा मिळाला त्यामुळे या समाजाचा विकास होऊ शकला नाही. तांडे विकास पासून कोसो दूर आहेत. समाजात शिक्षणाचे अल्प प्रमाण असल्यामुळे नोकरीचे प्रमाण देखील कमीच आहे, सत्तेत राजकीय भागीदारी न मिळाल्यामुळे बंजारा समाजाचे प्रश्न सभागृहात मांडले गेले नाही.त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात बंजारा समाजाच्या विकासासाठी कसलीही तरतूद केली नाही.अशा अनेक भेडसावणाऱ्या गोष्टी आम्हाला अस्वस्थ करत आहेत.या समस्याचे समाधान शोधण्यासाठी व राज्य तथा देशातील बंजारा समाजाला संघटित करून आपल्या न्याय हक्कासाठी एक दबाव गट निर्माण व्हावे या शुद्ध आणि पवित्र भावनेतून राष्ट्रीय बंजारा महासंघाची महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना सोबत घेऊन आज आम्ही स्थापना केले आहे.बंजारा समाजाला अनुसूचित जाती एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, प्रत्येक तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन व्हावी,बंजारा समाजाची बोलीभाषा गोरबोलीला राज्य भाषेचा दर्जा मिळावा, जनगणना मध्ये बंजारा समाजाची स्वतंत्र नोंद व्हावी,लोकसभा विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी तथा सत्तेत भागीदारी मिळावी,तांड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना एससी एसटी प्रवर्गाच्या धरतीवर शिष्यवृत्ती देण्यात यावी,पी.एम आवास योजनेतून प्रत्येक बंजारा बांधवांना घरकुल मिळावे,ऊसतोड कामगार व मुकादम मजुरीचे दर व कमीशन वाढवण्यात यावे,बंजारा समाजातील कवी लेखक साहित्यिक व प्रबोधक यांना दरमहा आर्थिक अनुदान देण्यात यावे,वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून बंजारा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी वीस लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, या व इतर महत्त्वाच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय बंजारा महासंघ भविष्यात काम करणार आहे,अशी माहिती भिकनभाऊ जाधव यांनी दिली. राष्ट्रीय बंजारा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रा.पी.टी.चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अमोलभाऊ पवार, प्रदेश कार्याध्यक्ष मधूकर भाऊ जाठोत यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला मुंबई, पुणे नाशिक नागपूर नांदेड यवतमाळ धाराशिव धुळे बुलडाणा हिंगोली लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर रायगड ठाणे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.



