बीड
एसआयआर कामातून शिक्षकांची सुटका करा;अनिलदादा जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

एसआयआर कामातून शिक्षकांची सुटका करा;अनिलदादा जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
========================
बीड, प्रतिनिधी – शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या एसआयआर मॅपिंग कामामुळे शैक्षणिक कामकाजावर गंभीर परिणाम होत असून शिक्षकांवरील मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक ताण वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांना एसआयआरच्या कामातून कायमस्वरूपी मुक्त करून हे काम इतर शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना आणि शिक्षकसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात शिक्षकांकडून एसआयआर अंतर्गत मॅपिंगसह विविध अतिरिक्त कामे करून घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांवर मानसिक व शारीरिक ताणही वाढत आहे. तसेच पाटोदा येथील महिला शिक्षिका आणि गेवराई तालुक्यातील शिक्षक योगेश बुंदेले यांच्याशी संबंधित घडलेल्या घटनांचा उल्लेख करत शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेने निवेदनातून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये 29 जुलैनंतरचे एसआयआर मॅपिंगचे काम पूर्णपणे बंद करणे, शिक्षकांची एसआयआर कामातून कायमस्वरूपी मुक्तता करणे, एसआयआर मॅपिंगचे काम करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल न करणे तसेच अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांची धमकी देऊन मानसिक छळ करू नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय महिला शिक्षकांना सायंकाळी 6 नंतर SIR च्या कामासाठी पाठवू नये, त्यांच्या सुरक्षिततेची व सन्मानाची हमी द्यावी, एसआयआर मॅपिंग साठी अधिकृत कामकाजाची वेळ निश्चित करावी, बीएलओ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व कामकाजाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या कामातून वगळावे, जनगणनेच्या धर्तीवर एसआयआर मॅपिंगचे काम करणाऱ्या शिक्षकांना अर्जित रजा मंजूर करावी, ऑन-ड्युटी बीएलओ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा किमान 10 लाख रुपयांचा विमा उतरवावा, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहण्यासाठी एसआयआर मॅपिंगचे काम इतर शासकीय अथवा निमशासकीय यंत्रणेकडे तात्काळ हस्तांतरित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. वरील सर्व मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक व सकारात्मक विचार करून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक सुनिल सुरवसे, उप जिल्हाप्रमुख अजय जाधव, शिक्षकशेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय कवचट सर, शिक्षकनेते सुनीलजी कुर्लेकर सर, राजेंद्रजी खेडकर सर शिक्षकसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष गणेश खेडकर सर, गोरक्ष तळेकर, प्रा . निलेश खेडकर सर, आकाश जगताप, प्रतिक कांबळे उपस्थित होते.



