बीड
तहानलेल्या श्रीवर्धनकरांसाठी ‘अनाथाचा नाथ’ धावला; मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी ८ कोटीचीं मंजूरी!

तहानलेल्या श्रीवर्धनकरांसाठी ‘अनाथाचा नाथ’ धावला; मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी ८ कोटीचीं मंजूरी!
भरतशेठ गोगावलेंच्या मध्यस्थीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; वेळोवेळी फुटणाऱ्या पाईपलाईनच्या त्रासातून श्रीवर्धनकरांना मिळणार मुक्ती!
श्रीवर्धन (संदेश घोलप):
गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तडफडणाऱ्या आणि निकृष्ट दर्जेदार पाणी योजनेचा त्रास सहन करणाऱ्या श्रीवर्धनकरांसाठी अखेर अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. श्रीवर्धन शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आणि वेळोवेळी फुटणारी मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी देण्याचे कबूल केले आहे. या मोठ्या निर्णयामुळे श्रीवर्धनकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रचंड मोठा दिलासा मिळाला असून, जनतेसाठी ‘अनाथाचा नाथ’ धावून आल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिष्टमंडळाने घेतली भरतशेठ गोगावले यांची भेट!
श्रीवर्धन शहरातील पाणी संकट अत्यंत गडद झाले होते. २४ कोटींच्या पाणी योजनेचा बोजवारा उडाल्यानंतर आणि मुख्य पाईपलाईन सतत फुटत असल्याने लाखो लीटर पाणी वाया जात होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्रीवर्धन येथील नगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आणि शिवसेना शहरप्रमुखांच्या एका प्रमुख शिष्टमंडळाने महाड पोलादपूरचे आमदार मा. भरतशेठ गोगावले साहेब यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने श्रीवर्धनकरांची व्यथा आणि पाणीटंचाईची भीषण वास्तवता गोगावले साहेबांसमोर मांडली.
गोगावले साहेबांचा उपमुख्यमंत्र्यांशी थेट संवाद; ८ कोटी मंजूर!
श्रीवर्धनकरांची ही पाणी कोंडी पाहताच मा. भरतशेठ गोगावले यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी तातडीने संपर्क साधला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. यावर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तत्परता दाखवत, श्रीवर्धन शहराची वेळोवेळी फुटणारी मुख्य जाळवाहिनी संपूर्णपणे बदलण्यासाठी ८ कोटी रुपये देण्याचे तात्काळ मंजूर केले.
श्रीवर्धनकरांसाठी अनाथाचा नाथ धावून आला – देवेंद्र भुसाणे
या संदर्भात माहिती देताना श्रीवर्धन नगरपालिकेचे गटनेते देवेंद्र भुसाणे यांनी सांगितले की, “श्रीवर्धनची जनता पाण्यासाठी अत्यंत हाल अपेष्टा सहन करत होती. निकृष्ट कामामुळे मुख्य पाईपलाईन सतत फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. मात्र, आमच्या शिष्टमंडळाने मा. भरतशेठ गोगावले साहेबांची भेट घेताच, त्यांनी श्रीवर्धनकरांसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. तहानलेल्या श्रीवर्धनकरांसाठी हा खूप मोठा दिलासा असून खऱ्या अर्थाने जनतेसाठी ‘अनाथाचा नाथ’ धावून आला आहे.”
या ८ कोटींच्या निधीमुळे आता श्रीवर्धन शहरातील गळक्या आणि फुटक्या पाईपलाईनचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असून, शहरवासीयांना शुद्ध आणि नियमित पाणी मिळणार असल्याने नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे.


