रानडुकरांनी लिंबागणेश परीसरातील शेतकऱ्यांची उडविली झोप रानडुकरांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाईची मागणी ; सौरकुंपणाची डॉ. श्यामाप्रसाद जन वन विकास योजना सरसकट लागू करा :- डॉ. गणेश ढवळे
—–
लिंबागणेश (दि.
०४) :-बीड तालुक्यातील लिंबागणेश, पिंपरनई, पोखरी (घाट), सोमनाथवाडी, इमुळुकवाडी व मसेवाडी या गावांतील शेतकऱ्यांचे पिके रानडुकरांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.
वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करून नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची मागणी
“आधीच अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली आहेत. काबाडकष्टाने उभं केलेलं पीक रानडुकरांमुळे उद्ध्वस्त होत आहे. वनविभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी प्रमोद निर्मळ, बाबासाहेब निर्मळ, दिनेश आवसरे, सुदाम तागड, नामदेव आवसरे, संदिपान वायभट, देवबा गव्हाणे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
सौरकुंपण योजना सरसकट लागू करावी – डॉ. गणेश ढवळे
“डॉ. श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजनेत केवळ जंगलालगतच्या गावांना सौरकुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरं, मोर, हरणे यांचा त्रास जंगलालगतच्या गावापुरता मर्यादित नसून अनेक शेतकरी गावांमध्ये होत आहे. त्यामुळे ही योजना सर्व गावांसाठी लागू करण्यात यावी,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी केली आहे.