बीड

खड्ड्यांनी चाळण झालेल्या जामखेड–करमाळा रोडला अखेर मलमपट्टी ; नगरसेवकांकडून रस्त्याची पाहणी

खड्ड्यांनी चाळण झालेल्या जामखेड–करमाळा रोडला अखेर मलमपट्टी ; नगरसेवकांकडून रस्त्याची पाहणी

महाराष्ट्र सूर्योदय च्या वृत्ताचा इफेक्ट;बातमीने प्रशासन जागे

जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरातील जामखेड–करमाळा रोडची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता अक्षरशः चाळण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाल्याने अपघात व वाहतुकीच्या समस्याही वाढल्या होत्या.या कामाची पाहणी करण्यासाठी जामखेड नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती तथा नगरसेवक मोहन पवार यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिली. यावेळी भाजपा शहर मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, युवा नेते अर्जुन म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते अनिल सदाफुले आदी उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल सदाफुले यांच्यासह अनेक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून निवेदने दिली होती. त्यानंतर याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. संबंधित विभागामार्फत खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यासाठी काम सुरू करण्यात आले.जामखेड–करमाळा रोडवरील खड्डे व दुरवस्थेबाबतची बातमी सर्वप्रथम दैनिक महाराष्ट्र सूर्योदयने प्रकाशित करून हा प्रश्न ऐरणीवर आणून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पाहणीदरम्यान काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे खडी व डांबर वापरले जात असल्याचीही चर्चा करण्यात आली. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले गटार निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचीही बाब यावेळी निदर्शनास आली. संबंधितांनी याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही उपस्थितांकडून करण्यात आली.

चौकट :
“रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचल्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांना धुळीचा मोठा सामना करावा लागत असून काही अपघातही झाले आहेत. तसेच रस्त्यालगत असलेली झाडे उन्हामुळे सुकू लागली असून त्यांना नियमित पाणी देणे आवश्यक आहे. झाडांभोवती बसविण्यात आलेल्या काही संरक्षण जाळ्या चोरीला गेल्या असून काही जाळ्या वाकलेल्या अवस्थेत आहेत.

अनिल सदाफुले
सामाजिक कार्यकर्ते, जामखेड

Back to top button