संपादकीय
पात्र शेतकऱ्यांचे सौर कृषी पंप तात्काळ अस्थापित करून द्यावेत – आ. विजयसिंह पंडित

पात्र शेतकऱ्यांचे सौर कृषी पंप तात्काळ
अस्थापित करून द्यावेत – आ. विजयसिंह पंडित
पारंपारीक विज जोडणीचा पर्याय खुला ठेवावा – आ. विजयसिंह पंडित
मुंबई, दि.१६ (प्रतिनिधी) ः- शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करून आवश्यक रक्कमेचा भरणा केल्यानंतरही त्यांना विहित मुदतीत सौर कृषी पंप मिळत नाहीत, पात्र शेतकऱ्यांचे सौर कृषी पंप तात्काळ अस्थापित करून द्यावेत आणि ज्या शेतकऱ्यांना पारंपारीक विज जोडणी हवी आहे, त्यांच्यासाठी पारंपारीक विज जोडणीचा पर्याय खुला ठेवावा अशी मागणी गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चे दरम्यान ते बोलत होते.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभा नियम २९३ अन्वये चर्चेत शेतकऱ्यांच्या सौर कृषी पंप आणि पारंपारीक विज जोडणीच्या प्रश्नावर आवाज उठवला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसूम योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप यांसारख्या अतिशय चांगल्या व स्तुत्य योजना शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या आहेत. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, त्यांपैकी ९५०० शेतकऱ्यांचे अर्ज मंजुर झाले असून या शेतकऱ्यांनी आवश्यक अनामत रक्कम भरणा केलेली आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन महिन्यांत नियमाप्रमाणे सौर कृषी पंप अस्थापित करून मिळणे आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. मागील सहा महिन्यांपासून शेतकरी महावितरणकडे पाठपुरावा करत आहे, परंतु त्यांना सौर पंप अस्थापित करून मिळत नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना तात्काळ सौर कृषी पंप अस्थापित करून देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात केली.
पुढे बोलता आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, सौर कृषी पंपाच्या संदर्भातील विविध योजना सुरु केल्यानंतर महावितरणने पारंपारीक विज जोडणी पूर्णपणे बंद करून महावितरणच्या पोर्टलवर सौर कृषी पंपाचा पर्याय सक्तिचा केलेला आहे. गेवराई विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. ऊसासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते, सौर कृषी पंपाच्या माध्यमातून योग्य दाबाने पाणी उपसा होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. शेतातील पाईप लाईन मधून पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे हे शेतकरी पारंपारीक विज जोडणीची मागणी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पारंपारीक विज जोडणीसाठी भरलेल्या अनामत रक्कमा महावितरणकडून परत करण्यात येत आहेत या बाबी गंभीर आहेत. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, योग्य दाबाने करता यावा यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना पारंपारीक विज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून अशा विज जोडणीसाठी अर्ज केले असल्यास त्यासाठीचे बंद केलेले दालन महावितरणने पुन्हा सुरु करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने पारंपारीक विज जोडणी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वेळेत अस्थापित करून द्यावेत आणि पारंपारीक विज जोडणीचा पर्याय खुला करून शेतकऱ्यांना योग्य दाबाने सुरळीत विज पुरवठा करण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात केली आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांकडून या बाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांचा आवाज आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात मांडल्यामुळे विविध स्तरातून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
![]()



