जायकवाडीतून माजलगाव धरणासाठी
पाणी सुटले, शेतकऱ्यांना दिलासा
आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीला यश
गेवराई, दि.१६ (प्रतिनिधी) ः- पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाचे पिके धोक्यात आली आहेत. पुरेसा पाऊस नसल्याने जमीनीचा ओलावा कमी होत आहे. ऊस, कापूस, सोयाबीन यांसारख्या नगदी पिकांची वाढ खुंटली आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले दिसते. जायकवाडी धरणाच्या कालव्यातील पाण्याच्या नियोजना संदर्भात मंगळवार, दि.१५ जुलै रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी कालव्यातून सिंचनासह माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी ही मागणी मान्य करून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार बुधवार, दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जायकवाडी जलाशयातून माजलगाव धरणासह सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात आली आहेत. खरीप पिकांसाठी पावसाची मोठी गरज असताना त्यात खंड पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, मुग, उडीद यांसारख्या पिकांच्या पेरणीसह मशागतीवर मोठा खर्च करून दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जायकवाडी धरण व कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी किमान धरणातील पाणी कालव्यात सोडून सिंचनाची व्यवस्था करण्याची मागणी वारंवार केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आ. विजयसिंह पंडित यांनी ही बाब राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मंगळवार, दि.१५ जुलै रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडी धरणाच्या कालव्यातील पाण्याच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन विधानभवन येथे केले होते.
या बैठकीत गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी धरणाच्या पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरण आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्याची विनंती केली होती. या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी सुध्दा अशा प्रकारची मागणी लावून धरली. त्यांच्या मागणीची दखल घेऊन कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवार, दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जायकवाडी जलाशयातून माजलगाव धरणासह सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून काही प्रमाणात त्यांच्या पिकांना जीवनदान मिळणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.