बीड
बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण सरडा म्हणजे शेतकऱ्यांची क्रुर थट्टाच! सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? :- डॉ.गणेश ढवळे

बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण सरडा म्हणजे शेतकऱ्यांची क्रुर थट्टाच! सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? :- डॉ.गणेश ढवळे
—
बीड:- ( दि.०३ ) बीड येथील छत्रपती संभाजी क्रिडांगणावर १ मे ते ५ मे दरम्यान भरविण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे मोठ्या थाटामाटात राजकीय पुढाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी विकास प्रतिष्ठान गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनाचे सुरूवातीपासूनच. मोठमोठ्या जाहिरातीद्वारे मुख्य आकर्षण म्हणून दक्षिण अमेरिकेतील साडे ५ फुटी “इग्वाना”जातीच्या सरड्याची दर्शनी भागात मोठमोठे होर्डिंग्ज लाऊन जाहिरातबाजी करण्यात आली.सततच्या अवकाळी पाऊस आणि दुष्काळी नैसर्गिक संकटामुळे मराठवाड्यातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. कृषी प्रदर्शनातून शेती आणि मातीशी नाळ जुळलेल्या शेतकऱ्यांना संकटातून उभारी यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती, प्रगतीशील शेतकऱ्याचे विकसनशील प्रयोग आदींची आवश्यकता असताना या प्रदर्शनात मुख्य आकर्षण म्हणून साडे ५ फुटीच्या सरड्याचा तमाशा नेमका कशामुळे ? सरकार शेळी अथवा कुक्कुटपालन याप्रमाणेच सरडे पालनासाठी अनुदान देणार आहे काय? आणि शेतकऱ्यांचा कळवळा म्हणून कृषी प्रदर्शन भरवणा-या आयोजकांनी ५० रूपये प्रवेश शुल्क ठेऊन याला व्यावसायिक रुप देऊन शेतकऱ्यांची क्रुर थट्टा केल्याची तिव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबाणेशकर यांनी दिली असुन कृषी विभाग याकडे डोळेझाक करत असल्याने शेतकऱ्यांनी याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.



