📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी – पो.नि. दशरथ चौधरी

कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी – पो.नि. दशरथ चौधरी

जामखेडमध्ये पोलीसांचे रूट मार्च व दंगा काबू सराव

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर सज्जता

जामखेड, ता. ५ : गणेशोत्सव २०२५ व ईद-ए-मिलाद या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आज सकाळी ९ ते ११ या वेळेत जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यांवरून झालेल्या या मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. यात पोलीस स्टेशन, बीड कॉर्नर, मेन पेठ, संविधान चौक, तपनेश्वर रोड, भुतवडा रोड, बीड रोड, खर्डा चौक ते परत पोलीस स्टेशन अशा महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता. मार्चदरम्यान नागरिकांनी पोलीस पथकाचे स्वागत करून शिस्तबद्धतेचे कौतुक केले.

यानंतर खर्डा चौक येथे दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला. सरावामध्ये अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी, जमाव नियंत्रण आणि शिस्त राखण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या सरावामुळे पोलीस दल सज्ज असल्याचा ठोस संदेश शहरवासीयांना देण्यात आला.

या उपक्रमासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, परि. पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्यासह जामखेड पोलीस ठाण्याचे ४२ पोलीस अंमलदार व ५२ होमगार्ड हजर होते.

पोलीस प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम केवळ शिस्तीचे प्रतीक नसून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा ठरला आहे. सण-उत्सव काळात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस दल नेहमी सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्च व दंगा काबू सरावातून देण्यात आला.

*चौकट*
——————————————-
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांची सुरक्षा व शांतता राखण्यासाठी जामखेड पोलीस दल सदैव सज्ज आहे. रूट मार्च व दंगा काबू सरावातून पोलीस दलाची तयारी व शिस्त यामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि विश्वास दृढ झाला आहे. सण साजरे करताना प्रत्येकाने कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.

*पोलीस निरीक्षक- दशरथ चौधरी*
जामखेड पोलीस स्टेशन, जामखेड

Back to top button