चांगुलपणा रुजवणाऱ्या स्पर्धा काळाची गरज – प्रा.मधुकर(आबा) राळेभात

चांगुलपणा रुजवणाऱ्या स्पर्धा काळाची गरज – प्रा.मधुकर(आबा) राळेभात
गौरी-गणेशोत्सवानिमित्त युवाशक्ती प्रतिष्ठान आयोजित ;खेळ पैठणी व बालस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड : युवाशक्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्पर्धा ही मुलांमध्ये चैतन्य निर्माण करणारी तसेच समाजात चांगुलपणा रुजवणारी ठरली आहे. बक्षीसदात्यांनी या स्पर्धेतून बालगोपाळांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आपल्या परिसरातील सामान्य लोकांचा सहभाग घेऊन मोहन (वस्ताद) पवार यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. हे निश्चितच गौरवास्पद आहे, अशी भावना भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केली.
शहरातील युवाशक्ती प्रतिष्ठानतर्फे गौरी-गणेशोत्सवानिमित्त आयोजित खेळ पैठणी व बाल मनोरंजन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी ते बोलत होते.
नगरसेवक मोहन (वस्ताद) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २ सप्टेंबर रोजी झालेल्या या सोहळ्यास महिलांबरोबरच लहान मुलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अमित पाळवदे, लहुशेठ पवार, नगरसेवक अमित जाधव, उद्योजक उमेश माळवदकर, सुरज पवार, अर्थराज गायकवाड, अक्षय भोगे, अल्ताफ शेख, सोनु औचरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लिंबू चमचा, संगीत खुर्ची, जिलेबी खाणे अशा बाल स्पर्धांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांसाठी खास ठेवलेली खेळ पैठणी स्पर्धा रंगतदार ठरली. लिंबू चमचा स्पर्धेत प्रकाश शिंदे प्रथम, क्षितिज निकाळजे द्वितीय तर दिव्या पवार तृतीय क्रमांकावर आले. जिलेबी खाणे स्पर्धेत मानसी घोडेस्वार हिने पहिला क्रमांक पटकावला, प्रेम जाधव दुसऱ्या तर प्रकाश शिंदे तिसऱ्या स्थानी राहिले. संगीत खुर्ची स्पर्धेत राजेश्वरी घोडेस्वार प्रथम, पूजा कोळेकर व शारदा बागडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.दरम्यान, लकी ड्रॉ च्या शारदा बगाडे या मानकरी ठरल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज पवार यांनी मानले.



