बीड
क्रांतिवीर लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींचे वाचन व्हावे

क्रांतिवीर लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींचे वाचन व्हावे
अनुसूचित जाती एकत्रित राहिल्या पाहिजेत – अजय सरवदे
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी बीड ते मंत्रालय मुंबई असा पायी लॉंग मार्च काढण्यात आला आहे. दहा दिवसांचा प्रवास पूर्ण करत हा लॉंग मार्च 20 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे दाखल झाला. यानिमित्त स्थानिक आंबेडकरी बांधवांच्या वतीने भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लॉंग मार्चचे समन्वयक अजय सरवदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींबाबत आमदार अमित गोरखे, विष्णू कसबे, अजिंक्य चांदणे, राजेश घोडे आणि प्रा. मिलिंद आव्हाड यांनी समाजासमोर सविस्तर भूमिका मांडावी. आयोगातील आरक्षण उपवर्गीकरण आणि मातंग समाजाला स्वतंत्र ५ टक्के आरक्षण या दोन मुद्द्यांपलीकडे जाऊन मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी करण्यात आलेल्या इतर ६६ शिफारशी जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरवदे म्हणाले की, अनुसूचित जातींमध्ये फूट पडू नये. सर्व घटकांनी एकत्र राहून शिक्षण, रोजगार, आर्थिक उन्नती आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे. आयोगातील समाजहिताच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अजय सरवदे यांनी केलेल्या रोखठोक, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणीमुळे सभास्थळी उपस्थितांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, अनुसूचित जातींची एकता आणि समाजहिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडून आली.



