
बीडमध्ये रंगणार आषाढी वारीच्या भक्तीचा सोहळा
*साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य वाणीतून ‘पांडुरंग अष्टक’ संगीतमय कथा!*
*बीडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २६ जूनपासून आयोजन*
बीड | दिनांक २३ (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून बीड येथील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने भक्तीमय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याअंतर्गत प्रवचनकार साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य वाणीतून ‘पांडुरंग अष्टक’ ही संगीतमय कथा दि. २६ जून ते ३० जून २०२६ दरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न होणार आहे.
आषाढी वारी सोहळ्यासाठी दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून, नव्हे तर संपूर्ण विश्वातून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने दाखल होत असतात. विठू नामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर आणि भगव्या पताक्यांच्या सावलीत संतांचा हा अथांग मेळा जेव्हा पंढरपूरकडे कूच करतो, तेव्हा अवघी धरणी भक्तीरसात न्हाऊन निघते. केवळ आणि केवळ विठ्ठल भेटीच्या तीव्र ओढीने लाखो पावले पंढरीची वाट चालत असतात. या वारीच्या वाटेवर भाविकांना विठ्ठल भक्तीची खरी ओढ निर्माण होते. वारीचे हेच आध्यात्मिक महत्त्व आणि भक्तीचे मर्म बीडमधील भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या विशेष कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या ज्ञानयज्ञात साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर आपल्या सुश्राव्य आणि संगीतमय निरूपणातून पांडुरंगाष्टक कथेचे सुरेख पुष्प गुंफणार आहेत. विठ्ठलाचे रूप, संतांचे अभंग आणि वारीची महान परंपरा यावर या कथेत प्रकाश टाकला जाईल. या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी बीड शहर व परिसरातील तमाम विठ्ठल भक्तांनी, महिलांनी आणि वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक गौतम खटोड आणि खटोड प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.



