बीड

राजपिंपरी गाव १५ ते २० दिवसांपासून अंधारात; सततच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त

राजपिंपरी गाव १५ ते २० दिवसांपासून अंधारात; सततच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त

गेवराई (प्रतिनिधी) — गेवराई तालुक्यातील राजपिंपरी गावात मागील १५ ते २० दिवसांपासून विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सततच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावामध्ये दिवसभर लाईटचा लपंडाव सुरू असून दर आठ दिवसांनी विजेच्या वेळापत्रकात बदल होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंतच वीजपुरवठा सुरळीत राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यानंतर वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेची लाट सुरू आहे, तर दुसरीकडे वीज नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रुग्णांना उकाड्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या, मोबाईल चार्जिंग, घरगुती कामे तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपंपांवरही याचा परिणाम होत आहे. सततच्या वीज खंडितामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “या प्रचंड उकाड्यात लाईट नसल्याने लोकांनी जगायचे तरी कसे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेऊन राजपिंपरी गावाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button