बीड

दादांच्या अकस्मिक निधनाने आम्ही पोरके झालो – अमरसिंह पंडित

दादांच्या अकस्मिक निधनाने आम्ही पोरके झालो – अमरसिंह पंडित

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा व कणखर नेता गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मनाला सुन्न करणारे होते. मागील अनेक वर्षांपासूनचा त्यांचा प्रदिर्घ सहवास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होता.
उत्तम प्रशासक, अभ्यासु नेता, रोखठोक आणि स्पष्टोक्तेपणा हे त्यांच्या स्वभावाचे गुण संपुर्ण महाराष्ट्राला भावले होते. त्यांच्या स्वभावात कठोरता असली तरी त्यांनी आपुलकी आणि आपलेपणा जोपासला. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणींना आज उजाळा मिळत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांप्रती त्यांची तळमळ आणि संवेदनशिलता मी जवळून अनुभवली आहे.

प्रशासनावर अचूक पकड असल्यामुळे व्यापक लोकहितासाठी नियमात न बसणारे अनेक कामे त्यांनी नियमात बसवून करून दाखवली आहेत. सत्ताधाऱ्यांपेक्षा पांढरपेशी प्रशासन वरचड होण्याच्या परिस्थितीत अजितदादांसारखा कणखर नेता महाराष्ट्राने गमावणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कधीच भरून निघणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपुर्ण महाराष्ट्राची त्यांच्या अकाली जाण्याने मोठी हानी झाली आहे.
सहकार, सिंचन, शेती, शिक्षण या क्षेत्रात त्यांचा अभ्यास होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील जनता त्यांच्याकडे आश्वासक विकासाची आस लावून बसले होते. पालकमंत्री पदाच्या अतिशय अल्प काळात त्यांनी जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प मंजुर करून जिल्हा वासियांना विकासाची चुणूक दाखवली होती. बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेबरोबर त्यांनी या कालावधीत अतुट नाते निर्माण केले होते. जाती-पातीच्या पलिकडे जावून त्यांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सतत जोपासण्याचे काम केले.

पंडित कुटूंबियांशी त्यांनी राजकारणा पलिकडे स्नेह जोपासला होता. त्यांच्या अशा अकस्मिक जाण्याने खऱ्या अर्थाने आम्ही पोरके झालो आहोत.
भावपूर्ण श्रध्दांजली…

Back to top button