अहिल्यानगर शिक्षक बँकेला ६.६८ कोटींचा नफा; संचालक संतोषकुमार राऊत यांचा शिक्षक संघातर्फे गौरव

अहिल्यानगर शिक्षक बँकेला ६.६८ कोटींचा नफा; संचालक संतोषकुमार राऊत यांचा शिक्षक संघातर्फे गौरव
जामखेड प्रतिनिधी:अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला चालू आर्थिक वर्षात ६.६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला असून, सभासदांच्या कायम ठेवींवर ७ टक्के दराने १४.६६ कोटी रुपयांचे व्याज त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी व्याज दर कायम ठेवण्यात आला असून यंदा ६९ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम सभासदांच्या वाट्याला आली आहे. यासोबतच संचालक मंडळाने मागील वर्षाच्या तुलनेत २.३३ कोटी रुपयांनी कमी खर्च करून काटकसरीच्या व्यवस्थापनाची सकारात्मक भूमिका पार पाडली, अशी माहिती संचालक श्री. संतोषकुमार राऊत यांनी दिली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ व संघप्रणित मंडळाच्या वतीने संचालक श्री. संतोषकुमार राऊत यांचा जामखेड शाखेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानी शिक्षक नेते किसन वराट होते तर राज्य सरचिटणीस राम निकम, संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष नारायण राऊत,नानासाहेब मोरे,शिक्षक नेते शिवाजी हजारे, अर्जुन पवार,नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, मोहळकर,विकास बगाडे, उत्तम पवार, दत्तात्रय यादव, मल्हारी पारखे, नवनाथ बहिर ,महेश मोरे, बाळासाहेब जरांडे, विजय रेणुके, अरुण मुरूमकर, अभिमान घोडेस्वार, अतुल कोल्हे, राम बांगर आदी शिक्षक उपस्थित होते.
संचालक श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले की, बँकेचे कर्ज वितरण मागील वर्षीच्या १०३७ कोटींपासून वाढून ११२७ कोटींवर गेले आहे. ठेवीतही लक्षणीय वाढ होऊन त्या १४५८ कोटींवरून १५३३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. खेळते भांडवल १६२१ कोटींपासून वाढून १६९८ कोटी रुपयांवर गेले आहे.
राऊत यांनी पुढे सांगितले की, बँकेत सात महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर संचालक मंडळाच्या एक कार्यपद्धतीकडे सभासदांचे लक्ष लागून होते. विरोधी मंडळाकडून कायम ठेवींवरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, संचालक मंडळाने राज्य उपनेते रावसाहेब रोहकले गुरुजी, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते रावसाहेब सुंबे, साहेबराव अनाप खेमनर, राम निकम, राजू राहणे, बाबा खरात साबळे, बाळासाहेब कदम
यांच्यासह शिक्षक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना न्याय दिला आहे.
राष्ट्रीयकृत बँकांचे व्याजदर वाढत असतानाही शिक्षक बँकेने व्याजदर सातत्याने कमी ठेवले आहेत. सभासद कल्याण निधीतून “शुभमंगल भेट” आणि आजारी सभासदांसाठी जवळपास ४० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच मयत सभासदांचे जवळपास ४ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १.५९ कोटी रुपयांनी नफा कमी असूनही संचालक मंडळाने व्यवस्थापन व इतर खर्चात बचत करून आर्थिक शिस्त राखली असल्याचे राऊत यांनी शेवटी नमूद केले.



