📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता
महंत बबन बहिरवाळ महाराजांच्या ‘काल्याच्या कीर्तनाने’ भाविक मंत्रमुग्ध

लिंबागणेश:-(दि. १४ ): बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानमध्ये अधिकमासानिमित्त दि. ७ जूनपासून मठाधिपती महंत शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याची आज दि.१४ रविवार रोजी श्री ह.भ.प. बबन महाराज बहिरवाळ (श्री संत मदन महाराज संस्थान, कडा) यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज व मठाधिपती शांतीब्रह्म तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह उत्साहात पार पडला. सांगता प्रसंगी बबन महाराज बहिरवाळ यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी ह.भ.प. अर्जन महाराज येडे, ह.भ.प. रंजीत महाराज, ह.भ.प. बबन महाराज वायकर, ह.भ.प. तुकाराम महाराज भोसले, ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे, किशोर महाराज येडे, माऊली महाराज शेळके, ह.भ.प. बाबा देशमुख महाराज, अशोक येडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

काल्याच्या कीर्तनातून बबन महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीलांपासून ते अवतारसमाप्तीपर्यंतच्या जीवनप्रवासाचे रसाळ निरूपण केले. “हे विश्वच माझे घर” या तत्त्वज्ञानाचा संदेश देत नामस्मरण, समभाव आणि विश्वबंधुत्व हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

सप्ताहादरम्यान विविध नामवंत कीर्तनकारांनी समाजप्रबोधनपर कीर्तनसेवा दिली. दि. ७ जून रोजी ह.भ.प. रंजित महाराज शिंदे (निनगुर), दि. ८ रोजी ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे (वैद्यकिन्ही), दि. ९ रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज उबाळे (च-हाटा), दि. १० रोजी ह.भ.प. दत्ता महाराज वायभट (पिंपरनई), दि. ११ रोजी ह.भ.प. त्र्यंबक महाराज मातकर (वरवटी), दि. १२ रोजी ह.भ.प. सुरेश महाराज जाधव (न्यूज १८ मराठी, बीड जिल्हा प्रतिनिधी) तसेच दि. १३ रोजी ह.भ.प. बबन महाराज मंझरीकर यांनी कीर्तन सेवा दिली.

पंचक्रोशीतील विविध गावांतील मृदंगाचार्य, वारकरी व भजनी मंडळांच्या सहभागातून हरिजागर, प्रवचन, भजन, हरिपाठ, पारायण, गाथा व काकडा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्र उत्सव समिती बेलगाव, बेलगाव तरुण मंडळ आणि विश्वस्त मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले.

पुरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ

काल्याच्या कीर्तनानंतर पंचक्रोशीतील भाविकांनी घरून वाजतगाजत आणलेल्या पुरणपोळ्या, गुळवणी, आमटी, कुरडई व भजी यांच्या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आस्वाद घेतला.

या संपूर्ण सप्ताहात पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

Back to top button