अन्नदाता वाचला तरच देश वाचेल-राजेंद्र मस्के आ. रोहीत दादा पवार यांच्या आंदोलनास’ पाठिंबा देण्यासाठी बीड मध्ये आज धरणे आंदोलन

आ. रोहीत दादा पवार यांच्या आंदोलनास’ पाठिंबा देण्यासाठी बीड मध्ये आज धरणे आंदोलन
बीड प्रतिनिधी:राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे युवा नेते तथा आ. रोहितदादा पवार यांनी १२ जूनपासून पंढरपूर येथे “अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन” सुरू केले आहे.
परंतु अद्याप राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्का साठी सुरू असलेल्या या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) बीड जिल्ह्याच्या वतीने सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
राज्यातील लाखो शेतकरी नापिकी, वाढता उत्पादन खर्च, अपुरा हमीभाव, नैसर्गिक संकटे आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफी योजनेतील जाचक अटी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत असून त्या तात्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे असल्याची भूमिका पक्षाने मांडली आहे. प्रत्येक कर्जबाजारी शेतकऱ्याला समान न्याय मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी
जाचक अटींचा फेरविचार करणे गरजेचे आहे.
अन्यथा ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना ठरेल.
आ. रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला बळ देण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीड येथे धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी या धरणे आंदोलनात पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,
शेतकरी हितचिंतक व संघटना, आणि शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे
“कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करा!”
“सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या!”
“शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!”



