बीड

भटक्याचं पालातील लेकरू झी मराठीवर झळकलं – ॲड. डॉ. अरुण जाधव

भटक्याचं पालातील लेकरू झी मराठीवर झळकलं – ॲड. डॉ. अरुण जाधव

कलाकार सुभाष चौगुले यांचा ग्रामीण विकास केंद्रांच्या वतीने सत्कार

जामखेड प्रतिनिधी – आपल्या अनोख्या विनोदी शैलीने झी मराठीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘चल भावा सिटीत’मध्ये रसिकांची मने जिंकणारे आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव आपल्या अभिनयातून उलगडणारे जामखेड तालुक्यातील सुभाष चौगुले यांचा ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला.

चौगुले यांनी ग्रामीण भाषेतील खास शैलीतून सादर केलेल्या विनोदी अभिनयामुळे हजारो तरुणांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कलेतून समाजातील मुद्दे, ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि विनोद यांचे प्रभावी चित्रण केले जाते.

या कार्यक्रमात ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या हस्ते त्यांचा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवक्ते बापूसाहेब ओव्हळ, सचिवा उमाताई जाधव, आदिवासी नेते विशाल पवार, ऋषिकेश गायकवाड, संतोष पवार,समन्वयक राजू शिंदे, दया चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. अरुण जाधव म्हणाले, “पालातील भटक्या समाजातून आलेला सुभाष, ज्याने दारोदारी भिक्षा मागून पोटाची खळगी भरली, तोच मुलगा आज झी मराठीवर दिसत आहे. हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. ज्यांनी त्याला संधी दिली, त्यांना सलाम करावा लागेल.”

सुभाष चौगुले हे आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडचे भूमिपुत्र असून भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजातील बहुरूपी कलाकार आहेत. गावोगावी फिरत कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या या कलाकाराने “चल भावा सिटीत” या कार्यक्रमातून आपली कला दाखवत ग्रामीण भागातील कलाकारांसाठी एक प्रेरणास्त्रोत निर्माण केला आहे.

Back to top button