निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक; न्याय न मिळाल्यास अमरण उपोषणाचा इशारा

निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक; न्याय न मिळाल्यास अमरण उपोषणाचा इशारा
जामखेड (प्रतिनिधी):रत्नापुर येथील शेतकरी शेख इन्नुस शेखलाल यांनी निखिल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नी हवावी इन्नुस शेख यांच्या नावावरील गट नंबर 554 मधील मुरूम सदर कंपनीला राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी च्या कामासाठी दिला होता. करारानुसार, मुरूमाच्या बदल्यात काळी माती पुन्हा त्या जागी भरून द्यायची होती किंवा ३०० रुपये प्रति ब्रास दराने मोबदला द्यायचा होता.
तथापि, कंपनीचे व्यवस्थापक श्री. प्रसाद शेळके यांनी वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. २१ जुलै २०२४ रोजी मागणी केल्यावर त्यांनी माती देण्यास नकार दिला आणि उलट “शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू” अशी धमकी दिली, असा आरोप अर्जदाराने केला आहे.
या प्रकरणात तब्बल ४००० ब्रास मुरूम कंपनीने नेला असून, शेतात सुमारे २० फूट खोल खड्डा निर्माण झाला आहे. परिणामी त्या कुटुंबाचे शेतीवर आधारित उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त झाले असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या फसवणुकीबाबत निखिल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि व्यवस्थापक श्री. प्रसाद शेळके यांच्यावर त्वरित कारवाई करावी, तसेच शेतकऱ्याला मोबदला किंवा काळी माती परत मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
न्याय न मिळाल्यास ९ जून २०२५ रोजी तहसील कार्यालय जामखेड येथे अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या कुटुंबाने दिला आहे. उपोषणात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार निखिल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. व श्री. प्रसाद शेळके असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण (आबा) जाधव व तालुका अध्यक्ष आतिश पारवे यांनीही पाठिंबा दिला आहे.



