बीड

आ. सुरेश धस यांनीच दूध भेसळीविरोधात सर्वाधिक आवाज उठवला

आ. सुरेश धस यांनीच दूध भेसळीविरोधात सर्वाधिक आवाज उठवला

दूध भेसळ प्रकरणात नाव न घेता माझी बदनामी करण्याचा प्रयत्न; पसरवल्या जाणाऱ्या अफवा निराधार
–प्राजक्ता धस

आष्टी (प्रतिनिधी)
राज्यात दूध भेसळीविरोधात सुरू असलेल्या व्यापक कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांतून नाव न घेता माझ्याबाबत संशय निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असून त्या पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामी करण्याच्या हेतूने प्रसिद्ध केल्या जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ “महानंद” मुंबईच्या संचालिका प्राजक्ता धस यांनी केला आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना सूचक पद्धतीने एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे ही पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून नसल्याचे सांगत, ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे असतील त्यांनी ते सार्वजनिक करावेत व संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत, अन्यथा अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या बातम्या तातडीने मागे घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

प्राजक्ता धस म्हणाल्या की, आमदार सुरेश धस यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात दूध भेसळीविरोधात सर्वाधिक आक्रमकपणे आवाज उठवला आहे. विधानसभेत, विविध चर्चांमध्ये तसेच दुग्धविकास मंत्र्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी वारंवार दूध भेसळीचा प्रश्न उपस्थित केला. दूध भेसळीसारख्या गंभीर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचीही त्यांनी सातत्याने मागणी केली.अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा ही मागणी त्यांचीच आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे दावा केला की, आमदार सुरेश धस यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच दूध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून गुन्हे दाखल होण्यास गती मिळाली आहे. मात्र, याच कारवाईची धार कमी करण्यासाठी आणि जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यापासून विचलित करण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून नियोजनबद्ध पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत.

प्राजक्ता धस यांनी आरोप केला की, शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित काही विशिष्ट राजकीय व्यक्ती आमदार सुरेश धस यांनी उघड केलेल्या दूध भेसळ प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी जाणूनबुजून अपप्रचार करत आहेत. काही समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांमधून “बीडमधील आमदाराची पत्नी”, “बड्या नेत्याची पत्नी” अशा शब्दांत बातम्या प्रसिद्ध करून प्रत्यक्ष नाव न घेता संशयाची सुई आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित पत्रकारांकडे विचारणा केली असता “त्या बातमीत तुमचे नाव नाही,” असे उत्तर देण्यात आले. मात्र, नाव न घेता एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे ही “खोटे आरोप आणि दिशाभूल करणाऱ्या अफवांमुळे समाजात नैतिक अधःपतनाला खतपाणी घातले जात आहे.”
पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील एका दूध डेअरीबाबत संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर त्या डेअरीची चौकशी व्हावी, यासाठी आपण स्वतः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना संदेश पाठवून तपासाची मागणी केली होती, असे प्राजक्ता धस यांनी सांगितले. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

“गेल्या पंधरा वर्षांपासून माझा मंचर येथील दूध संघ, दूध पावडर प्रकल्पाशी संबंध नाही.
आष्टी तालुक्यात यापूर्वी उघडकीस आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणाचे धागेदोरे पुणे जिल्ह्यातील मंचर-आंबेगाव परिसरातील काही दूध संघांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती. त्याचे पुढे काहीच झाले नाही.यामुळे आजही मंचर परिसरातील दूध व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध भेसळीविरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळेच आपल्याविरोधात अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा दावा त्यांनी केला. तसेच स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतरही आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगत, समाजहिताचे प्रश्न मांडणाऱ्यांना खोट्या प्रकरणांत अडकवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अनुभव आम्हाला आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राजक्ता धस यांनी पुढे दावा केला की, आष्टी दूध संघाने गुणवत्तेच्या कारणास्तव नाकारलेले दूध काही अन्य डेअऱ्यांकडून स्वीकारले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या. संबंधित डेअरीकडून बल्क मिल्क कूलर (BMC) चालक तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन-तीन महिने दूध पुरवठ्याचे पैसे दिले जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. अनेक पुरवठादार आर्थिक अडचणीत सापडले असून, या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी आणि मोठे गौडबंगाल समोर येऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.

ज्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे असतील त्यांनी ते समाजमाध्यमांवर अपप्रचार करण्याऐवजी सार्वजनिक करावेत आणि संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत.
“दूध भेसळ हा जनतेच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय आहे. या विषयावर राजकारण न करता कोणताही दोषी मोठा असो किंवा लहान, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र खोटे आरोप करून दूध भेसळीविरोधात लढणाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जनतेने ओळखावा,” असे आवाहन प्राजक्ता धस यांनी शेवटी केले.

Back to top button