📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निवडणूक आयोगावरील राहुल गांधींची वक्तव्ये अभ्यासशून्य ; लोकांची दिशाभूल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

निवडणूक आयोगावरील राहुल गांधींची वक्तव्ये अभ्यासशून्य ; लोकांची दिशाभूल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेत ना. पंकजाताई मुंडेंचा काँग्रेस आघाडीवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर दि. २८ —
निवडणूक आयोगाच्या कारभारावरून काँग्रेस नेते राहुल गांधींकडून करण्यात येणारी वक्तव्ये ही अभ्यासशून्य असून, त्यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केला. निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ना. पंकजाताई मुंडे बोलत होत्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडे देशात सुरू असलेल्या एसआयआर प्रकियेवरून निवडणूक आयोग आणि मतदार यादीतील बदलांवर गंभीर आरोप केले आहेत.  त्यावर  प्रतिक्रिया देताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, “पराभव स्वीकारणे विरोधकांना जमत नाही. निवडणुकीनंतर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्याऐवजी निवडणूक आयोगावर आरोप करून लोकांना संभ्रमित करण्याचे काम केले जात आहे.”

“आम्ही संविधानासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, आयोगासाठी नाही. लोकांना कन्फ्युज करणे हे आमचे काम नाही. सनसनाटी निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत,” असा टोलाही पंकजाताई मुंडे यांनी लगावला.

भारतीयांना सुरक्षा देणं आमचं कर्तव्य
——
देशात अवैध पध्दतीने राहणारे लोकं वैध नागरिकांच्या हिश्याचा वाटा घेत आहेत, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, अवैध नागरिक, अवैध मतदान कमी करून खऱ्या भारतीय नागरीकांना सुरक्षा देणं हे आमचं कर्तव्य आहे असे सांगत निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने आपल्या राजकीय पराभवाचे आत्मपरीक्षण करून वस्तुस्थिती स्वीकारावी, असा सल्लाही पंकजाताई मुंडे यांनी दिला.
••••

Back to top button