बीड

हुनरवेलीमध्ये श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

हुनरवेलीमध्ये श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
श्रीराम नवमीचे औचित्य साधून २४ ते २६ मार्चदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम
श्रीवर्धन (संदेश घोलप): श्रीवर्धन तालुक्यातील मौजे हुनरवेली येथे ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन श्रीराम नवमी दिनाचे औचित्य साधून २४ ते २६ मार्च २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
स्थानिक ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित हुनरवेली ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकारातून साकारलेले हे मंदिर गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरत आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून उभारलेले हे मंदिर गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जात आहे.
सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा, भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता पासून प्राणप्रतिष्ठा या धार्मिक विधींनी कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे.
बुधवार, दि. २५ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता मूर्ती स्थापना व कलशारोहण, तर दुपारी ३.०० वाजता उद्घाटन व उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. रात्री १०.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. २६ मार्च हा मुख्य सोहळ्याचा मुख्य दिवस असून श्रीराम नवमीचे औचित्य साधून सकाळी १०.०० वाजता सत्यनारायणाची महापूजा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी ३.३० वाजता श्रीराम पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येणार आहे.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हुनरवेली ग्रामस्थ मंडळ (मुंबई व स्थानिक), ज्योति महिला मंडळ तसेच जय भवानी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. यामध्ये श्री. राजेश ढापले, श्री. प्रकाश सुर्वे, सौ. शीतल ठोंबरे, श्री. अनंत रामणे, श्री. प्रथमेश रामाणे आदी पदाधिकारी सक्रियपणे सहभाग घेत असून नियोजनाची जबाबदारी पार पाडत आहेत.
या सोहळ्यासाठी परिसरातील तसेच बाहेरील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, आयोजन समितीकडून आवश्यक सुविधा व व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक व धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button