मराठी तसेच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध – योगेश कदम

मराठी तसेच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध – योगेश कदम
दापोली. दि, ९ नोव्हेंबर, २०२५:
दापोली तालुक्यातील मौजे कुंभवे येथील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळेचा अमृत महोत्सव आणि भूमिपूजन सोहळा आज योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे लोकार्पण तसेच नव्याने मंजूर झालेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
मराठी भाषा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे व त्यांचा विकास साधणे ही शासनाची प्रमुख जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. या शाळेची पटसंख्या वाढत असल्याचा आनंद व्यक्त करत गावातील नागरिक आणि शाळा प्रशासनाचे कौतुक करण्यात आले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीत शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून, “आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे शिक्षकच असतात,” अशा शब्दांत शिक्षकांप्रती कृतज्ञता यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल पंचाहत्तर वर्षांपूर्वी या शाळेत शिक्षण घेतलेल्या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा योगेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या अमृतमहोत्सव प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शशिकांतजी चव्हाण, तालुका प्रमुख श्री. उन्मेषजी राजे, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. किशोरजी देसाई, माजी जि. प. समाजकल्याण सभापती श्री. भागवनजी घाडगे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सदस्य श्री. किशोरजी दळवी, सरपंच श्री. लक्ष्मणजी झाडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. हरेशजी चोरगे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सांगडे, माजी सरपंच श्री. अनंतजी मांडवकर, तसेच शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, ग्रामस्थ मंडळ कुंभवे आणि आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



