बीड

श्रीवर्धन नगरपरिषदेकडून ‘मोबाईल संपर्क’ उपक्रम; दाखल्यांसाठी होणारी दिरंगाई होणार कमी

श्रीवर्धन नगरपरिषदेकडून ‘मोबाईल संपर्क’ उपक्रम; दाखल्यांसाठी होणारी दिरंगाई होणार कमी

श्रीवर्धन (संदेश घोलप )श्रीवर्धन शहरातील नागरिकांना विविध दाखले मिळवताना करावे लागणारे वारंवार हेलपाटे आणि कार्यालयीन दिरंगाई लक्षात घेऊन श्रीवर्धन नगरपरिषदेकडून नवा ‘मोबाईल संपर्क’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अर्जातील त्रुटी, आवश्यक कागदपत्रांची कमतरता किंवा कर थकबाकी याबाबतची माहिती संबंधित नागरिकांना थेट भ्रमणध्वनीवर कळविण्यात येणार आहे.
नगरपरिषद कार्यालयात रहिवासी दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आदींसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असतात. मात्र कागदपत्रे अपूर्ण असणे, संबंधित अधिकारी उपलब्ध नसणे किंवा कर बाकी असल्यामुळे अर्ज प्रलंबित राहतात. परिणामी नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो.
नव्या योजनेनुसार अर्ज दाखल होताच त्याची अधिकृत नोंद केली जाईल. त्यानंतर अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यास संबंधित व्यक्तीस तत्काळ फोन करून माहिती दिली जाईल. त्यामुळे अनावश्यक फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
यासोबतच आवश्यक कागदपत्रांची यादी कार्यालयात फलकावर लावण्यात येणार असून विविध विभागांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले जाणार आहेत. यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नगराध्यक्ष अतुलजी चौगुले यांनी सांगितले की, “जनतेची गैरसोय टाळणे आणि कामकाज अधिक पारदर्शक करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. लवकरच ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाईल.”
या निर्णयामुळे श्रीवर्धनकरांना मोठा दिलासा मिळणार असून नगरपरिषदेच्या कामकाजात गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Back to top button