तालुका स्तरावर जामखेड न्यायालय प्रथम – लोकअदालतीत मोठी कामगिरी

तालुका स्तरावर जामखेड न्यायालय प्रथम – लोकअदालतीत मोठी कामगिरी
“जलद आणि समान न्याय मिळवण्यासाठी लोकअदालती महत्त्वाच्या” – न्यायाधीश वैभव जोशी
जामखेड – राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जामखेड न्यायालयाने 8160 हून अधिक प्रकरणे निकाली काढत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यायालयाचे दिवाणी व प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वैभव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली.
दि. २२ मार्च २०२५ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयाने मोठ्या प्रमाणात प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढली. लोकअदालतीत वादविवाद, वेळ आणि खर्च वाचवून तडजोडीद्वारे दोन्ही पक्षकारांचा न्याय होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळून प्रकरणांचा जलदगतीने निपटारा केला जातो. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली व विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येतो.
दरम्यान, जामखेड पंचायत समितीने विक्रमी 34.96 लाख रुपयांची कर वसुली केली आहे. महसुली वाढीच्या दृष्टीने ही मोठी कामगिरी मानली जात आहे. न्यायालय व प्रशासनाच्या या प्रभावी कामगिरीमुळे तालुक्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.



