जामखेडमध्ये २७० स्वयंसेवकांचा गणवेशात पथसंचलन

राष्ट्रप्रथम’चा जयघोष! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षात भव्य पदार्पण
जामखेड प्रतिनिधी :
राष्ट्रप्रथम या भावनेचा जयघोष करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षात दमदार पदार्पण केले. संघाच्या शताब्दी उत्सवानिमित्त जामखेड येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात तब्बल २७० स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात पथसंचलन केले. बाजार समितीपासून महावीर भवनपर्यंतच्या संचलनावेळी फुलांच्या वर्षावाने व दुतर्फा रांगोळ्यांनी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
महावीर भवन येथे झालेल्या शस्त्र पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जामखेड तालुका कार्यवाह बाळासाहेब दळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिमाताई कुंदन गायकवाड (स्वच्छता दूत) गेली २० वर्षे नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कार्यरत तसेच कॅप्टन लक्ष्मण भोरे, ज्यांनी देशसेवेसाठी आयुष्य समर्पित केले आहे, यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते यशोवर्धन वाळिंबे यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या १०० वर्षांत सेवा, सुरक्षा आणि संघटन या त्रिवेणीचा संगम साधत ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेने काम केले आहे. पुढील काळात स्वयंसेवक स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन व पर्यावरण या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून घराघरांत जनजागृती करतील.
वाळिंबे पुढे म्हणाले की,देशात जात, प्रांत, भाषा आणि आंदोलनांच्या माध्यमातून अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न काही परकीय शक्ती करत आहेत. अशा शक्तींना ओळखून त्यांचा डाव हाणून पाडणे ही प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाची जबाबदारी आहे.डॉ. हेडगेवार यांनी १०० वर्षांपूर्वी नागपूर येथे काही निवडक सहकाऱ्यांसह संघटनेची स्थापना केली. तेव्हाचे ते लहान रोपटे आज भव्य वटवृक्षात रुपांतरित झाले आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार संघ आजही हिंदू समाजाचे संघटन व राष्ट्रप्रथम या भावनेने अखंड कार्यरत आहे.



