बीड
भगवानगडाच्या नारळी सप्ताहासाठी आज माजीमंत्री धनंजयजी मुंडे, प्रा.लक्ष्मण हाके सर यांच्यासह दिग्गजांची बडेवाडीमध्ये राहणार उपस्थिती

भगवानगडाच्या नारळी सप्ताहासाठी आज माजीमंत्री धनंजयजी मुंडे, प्रा.लक्ष्मण हाके सर यांच्यासह दिग्गजांची बडेवाडीमध्ये राहणार उपस्थिती
*महंत न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार नारळी सप्ताहाची सांगता*
भगवानगड : श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहाच्या ९२ व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे भगवानगडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या बडेवाडी ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू असून सप्ताहाचा आज काला आहे. श्री संत भगवानबाबांनी फिरता नारळी सप्ताहाचा नाविन्यपुर्ण उपक्रम ९२ वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांचे पश्चात तीच सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी अष्टपैलू संत, वै.ह.भ.प.गुरुवर्य श्री संत भिमसिह महाराज यांनी सुरू ठेवत बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. वै.गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे तृतीय उत्तराधिकारी तथा विद्यमान मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताह वैभवशाली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविकांची सप्ताहामध्ये आठवडाभर उपस्थिती आहे. नारळाचे यजमानपद स्विकारलेले बडेवाडी ग्रामस्थ आठवडाभर तन, मन आणि धन खर्ची घालत श्रीगुरूंची सेवा करत आहेत.
३१ मार्च रोजी हा महोत्सव प्रारंभ झाला असून सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भागवताचार्य ह.भ.प. श्री.प्रकाश महाराज साठे यांच्या अमृततुल्य रसाळवाणीतून ७ दिवस भव्य श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचा उपस्थित लाखो भाविकांना लाभ झाला आहे. सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्री.रामगिरी महाराज (येळेश्वर संस्थान येळी), ह.भ.प.श्री.महेंद्र महाराज महाराज शास्त्री, ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ह.भ.प.श्री.प्रभाकर महाराज बोधले पंढरपूरकर, श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांच्या कीर्तन सेवा संपन्न झाल्या असून सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री ठीक ८:३० ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे जागराचे सुश्राव्य, अमृततुल्य कीर्तन संपन्न झाले आहे. आज काल्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इ. धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. आज काल्याच्या दिवशी माजी मंत्री लोकनेते धनंजयजी मुंडे साहेब, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, माजी आमदार बाळासाहेब आजबे, ओबीसी योद्धे प्रा. लक्ष्मणराव हाके सर, प्रताप काका ढाकणे इत्यादींसह दिग्गज व मातब्बर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.



