पत्रकाराला धमकीच्या भाषेने खळबळ, शहरातील दादागिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह!

परळी, दि. 02 एप्रिल 2026 – परळी येथील अपघात प्रकरणावरून सुरू झालेला सोशल मीडिया वाद आता गंभीर वळणावर पोहोचला असून, पत्रकाराला उद्देशून करण्यात आलेल्या कथित धमकीच्या भाषेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ पत्रकार बालकिशन सोनी यांनी अपघाताबाबत आपली भूमिका स्पष्ट करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी अपघाताची शहानिशा न करता आपली, आपल्या कुटुंबीयांची व व्यवसायाची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच, प्रत्यक्षात ह्युंदाई औरा वाहनाने सेंटर लाईन ओलांडून टाटा मेगा वाहनाला धडक दिल्याचा दावा त्यांनी मांडला होता. अपघातग्रस्त वाहनाचा त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, या पोस्टवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव व सोशल मीडिया सेल समन्वयक अनंत ढोपरे यांनी “गेल्या वर्षी एक सोनीला धडा शिकवला होता, आता तुमची पाळी” अशा आशयाची कमेंट केल्याचा आरोप समोर आला आहे. या वक्तव्यामुळे केवळ वादच नव्हे, तर धमकीची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, बालकिशन सोनी हे ज्येष्ठ पत्रकार असून पत्रकारांना अशा प्रकारे उद्देशून धमकीची भाषा वापरणे हे अत्यंत गंभीर मानले जात आहे. यामुळे परळी शहरातील पत्रकारितेच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “एका सोनीला संपवले होते” या उल्लेखामुळे नेमके त्या घटनेत संबंधित धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते अनंत धोपरे याचा हात आहे का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे परळी शहरातील वातावरण पुन्हा ढवळून निघाले असून, व्यापारी व उद्योग क्षेत्रात आधीच असलेल्या दबावशाहीच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. शहरात दादागिरी व राजकीय दबाव वाढत असल्याची भावना व्यक्त होत असून, याचा थेट परिणाम व्यापार, उद्योग व पत्रकारिता या तिन्ही क्षेत्रांवर होत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच धमकीच्या भाषेला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. परळी शहरातील वाढती दादागिरी थांबणार का, असा सवाल आता जोर धरू लागला आहे.



