📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, राजकीय नाही! नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी

पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, राजकीय नाही! नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी
भुतवडा तलावाची नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून पाहणी; ३० टँकरची मागणी,पाणी जपून वापरण्याचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी : शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या भुतवडा तलावातील पाणीसाठा घटत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांच्यासह उपनगराध्यक्ष, सभापती व नगरसेवकांनी शनिवारी (दि. ३१) तलावाची पाहणी केली. शहराचा पाणीप्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, अशी भूमिका नगराध्यक्षांनी मांडत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,पाणीपुरवठ्याचे सभापती श्रीराम डोके,नगरसेवक विकी घायतडक,हर्षद काळे, नगरसेविका नंदा होळकर,प्रविण चोरडिया,माजी नगरसेवक अमित चिंतामणी,अशोक शेळके,मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर,सागर टकले, पाणीपुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्यासह जामखेड नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
भुतवडा तलावातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर आवश्यकतेपुरताच करावा. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, असे आवाहन चिंतामणी यांनी केले. सध्या साधारणतः बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू असून, पाच मोटारींच्या साहाय्याने पाणी चारीतून टाकीत सोडले जात आहे.
शहरातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने ३० टँकरची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला आहे. या माध्यमातून दररोज सुमारे सहा लाख लिटर पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. मांदळी आणि चौंडी येथील जलस्रोतांचाही टँकरसाठी विचार केला जात आहे. मात्र, प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच प्रत्यक्ष टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके यांनीही पाणीप्रश्नावर राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विरोधकांकडून पराभवाच्या पार्श्वभूमीवर आरोप होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, आगामी काळात शहराच्या विकासासह जनहिताच्या कामांना प्राधान्य देणार असून, पुढील महिन्यात बारा घंटागाड्या सुरू करण्याचे नियोजन असल्याचे नगराध्यक्षा चिंतामणी यांनी सांगितले.

Back to top button