जामखेड–सौताडा रस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

जामखेड–सौताडा रस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया
जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील मुख्य असलेल्या खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल या अंतर्गत रस्त्याच्या संथ कामावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी थेट हस्तक्षेप करत ‘अॅक्शन मोड’मध्ये येत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना कडक शब्दांत धारेवर धरले आहे.
जामखेड तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या रखडलेल्या कामाची सविस्तर माहिती घेतली. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला तात्काळ गती देऊन रस्ता पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
रस्त्याच्या कामात कोणीही अडथळा निर्माण करत असेल, तर ठेकेदारांनी पोलिस संरक्षण घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा ठाम सूचना डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. रस्त्याच्या कामाबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही, असे सांगत त्यांनी अधिकारी व ठेकेदारांची चांगलीच झाडाझडती घेतली.
या बैठकीस तहसीलदार धनंजय बांगर, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार, तालुका कृषी अधिकारी रविंद्र घुले, सहायक निबंधक दिलीप तिजोरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनेक महिन्यांपासून समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक हा रस्ता संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी, धूळ आणि चिखलामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पूर्ण झाला पाहिजे, असे ठामपणे सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जामखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून तेही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या. तसेच आगामी निकालाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथील मतदान स्ट्राँग रूमची तपासणी करत तेथील सुरक्षेचा आढावा घेतला.
महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, नगरपरिषद आदी विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेताना २१ डिसेंबर रोजी निकाल असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
चौकट
————–
जामखेड–सौताडा रस्त्याच्या कामावर जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालत ‘अॅक्शन मोड’मध्ये आल्याने हे रखडलेले काम आता प्रत्यक्षात मार्गी लागणार का, याकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.



