📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

युनिटी ग्रुपचा ऐतिहासिक पुढाकार; ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळाच्या एकजुटीतून साखरोणे गाव होणार ‘स्वच्छ-सुंदर आणि आदर्श गांव’

युनिटी ग्रुपचा ऐतिहासिक पुढाकार; ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळाच्या एकजुटीतून साखरोणे गाव होणार ‘स्वच्छ-सुंदर आणि आदर्श गांव’

​श्रीवर्धन (संदेश घोलप):
रायगड जिल्ह्याच्या निसर्गसंपन्न कोकण पट्ट्यातील श्रीवर्धन तालुक्यातील साखरोणे गावाच्या शिरपेचात स्वच्छतेचा मानाचा तुरा रोवण्यासाठी ‘युनिटी ग्रुप’ आता सज्ज झाला आहे. सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकासाचे ध्येय उराशी बाळगून येत्या रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी साखरोणे येथे ‘स्वच्छोत्सव २०२६’ या भव्य ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून मुंबईकर मंडळ देखील मोठ्या संख्येने या लोकचळवळीत सहभागी होणार आहे.
​गावच्या विकासासाठी प्रथमच ‘स्वच्छोत्सव’चा एल्गार
​’स्वच्छ गाव, सुंदर गाव’ ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी युनिटी ग्रुपने यावर्षी प्रथमच या व्यापक मोहिमेचे पाऊल उचलले आहे. रविवारी सकाळी ठीक ८:०० वाजता गावच्या ऐतिहासिक पटांगणातून या महाअभियानाचा शंखनाद केला जाईल. गावातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, गटारे आणि कचरा कुंडी परिसराची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करून गावाला नवी झळाळी देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
​कर्तृत्वाचा कणा: प्रमुख आयोजक आणि नियोजक
​या महास्वच्छता मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी युनिटी ग्रुपचे मार्गदर्शक गणेश खोपरे, निवेदिता खोपरे, सुशांत लाणे आणि राज खोपरे हे विशेष परिश्रम घेत आहेत. त्यांच्या नियोजनाखाली गावातील तरुण वर्ग, महिला शक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. केवळ एक दिवसाची स्वच्छता न करता, ‘प्लास्टिकमुक्त साखरोणे’ आणि ‘कचरामुक्त परिसर’ ही शिस्त घराघरात पोहोचवण्याचे उद्दिष्ट या टीमने समोर ठेवले आहे.
​मुंबईकर मंडळाची मोलाची साथ गावाला मिळाली असून नवी उभारी आली आहे, गावाच्या हाकेला ओ देऊन मुंबईस्थित साखरोणेकर मंडळी विशेषत्वाने या मोहिमेसाठी गावात दाखल होणार आहेत. मुंबईकर मंडळाच्या या सक्रिय पाठिंबामुळे ग्रामस्थांमध्ये नवा उत्साह संचारला असून, “गावच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी चाकरमानी आणि गावकरी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा गावाचा कायापालट निश्चित असतो,” अशी भावना साखरोणे ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
​स्वच्छता ही आरोग्याची पहिली पायरी आहे, हे जाणून साखरोणे गावाला संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात एक ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार यावेळी केला जाणार आहे. या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्याप्रती जनजागृतीही केली जाईल.
​तरी या ‘स्वच्छोत्सवात’ साखरोणे परिसरातील प्रत्येक नागरिकाने आपला खारीचा वाटा उचलून या ग्रामविकासाच्या महायज्ञात सहभागी व्हावे, असे आग्रहाचे आवाहन गणेश खोपरे, सुशांत लाणे आणि समस्त युनिटी ग्रुप सदस्यांनी केले आहे.
Back to top button