📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

PWD ची माघार! राष्ट्रवादीच्या इशाऱ्यामुळे पांगलोळी रस्त्याचे काम मुदतीपूर्वीच सुरू होणार अझहर धनसे यांच्या जनलढ्याला यश; पवार साहेब व शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छेडलेल्या आंदोलनाची दखल

PWD ची माघार! राष्ट्रवादीच्या इशाऱ्यामुळे पांगलोळी रस्त्याचे काम मुदतीपूर्वीच सुरू होणार

अझहर धनसे यांच्या जनलढ्याला यश; पवार साहेब व शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छेडलेल्या आंदोलनाची दखल
म्हसळा / श्रीवर्धन (संदेश घोलप):
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या लोकहिताच्या विचारांनुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने जनहिताचा आणखी एक लढा यशस्वी करून दाखवला आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ते पाणदरे या प्रलंबित रस्त्याच्या डांबरीकरणासाठी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री. अझहर धनसे यांनी पुकारलेल्या संघर्षापुढे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) नमते घेतले आहे. प्रशासनाने आंदोलनापूर्वीच प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
पांगलोळी ते पाणदरे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत होते. रस्त्याचे डांबरीकरण तातडीने व्हावे यासाठी श्री. अझहर धनसे यांनी प्रशासनाशी सातत्याने तब्बल सात वेळा अधिकृत पत्रव्यवहार केला होता. मात्र, प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे पाहून, पवार साहेबांच्या ‘जनतेच्या हक्कासाठी लढण्याच्या’ शिकवणीनुसार धनसे यांनी २ नोव्हेंबर २०२६ पूर्वी प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास थेट बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
या इशाऱ्याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने (उपविभाग श्रीवर्धन क्र. १) तात्काळ पावले उचलत अधिकृत पत्र जारी केले. संबंधित कंत्राटदारास तातडीने वर्क ऑर्डर देणे, तांत्रिक सोपस्कार पूर्ण करणे आणि कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रशासनाने पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच, दिलेल्या मुदतीपूर्वीच काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येत असल्याची लेखी हमी देत PWD ने उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
 “आदरणीय शरद पवार साहेबांचे नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांचे मार्गदर्शन हीच आमची खरी ताकद आहे. पांगलोळी गावचा विकास कुठेही थांबू दिला जाणार नाही आणि रस्त्याचे हे काम अत्यंत दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण होईपर्यंत आमचे प्रशासनावर बारीक लक्ष राहील.”
श्री. अझहर धनसे (रायगड जिल्हा संघटक व श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) या आक्रमक भूमिकेमुळे आणि अझहर धनसे यांच्या जनलढ्याला मिळालेल्या या यशामुळे पांगलोळी व परिसरातील नागरिकांमधून अत्यंत समाधानाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.

Back to top button