रोम जळतंय… सरकार मात्र ‘निरो’सारखं शांत! — आ.रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा

रोम जळतंय… सरकार मात्र ‘निरो’सारखं शांत! — आ.रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा
ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेलचा तुटवडा
जामखेड प्रतिनिधी:राज्यात निर्माण झालेल्या डिझेल-पेट्रोल तुटवड्यावरून आमदार रोहित पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने मशागतीची कामे खोळंबली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
आ.रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, डिझेल-पेट्रोलचा वरूनच पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना इंधन मिळत नाही. परिणामी ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामं थांबली आहेत.
जळगाव जिल्ह्यात तर इंधनसाठा पूर्णतः संपल्याने रात्रीपासूनच पंपांवर मोठ्या रांगा लागल्या आहेत.राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती असूनही सरकारला अद्याप जाग येताना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पेपरफुटी, इंधन तुटवडा, महागाई, महिला अत्याचार अशा अनेक समस्यांनी जनता त्रस्त आहे. मात्र सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.केंद्र आणि राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेवर निशाणा साधताना आमदार रोहित पवार म्हणाले, ही परिस्थिती पाहता रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या निरोची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
दरम्यान, इंधन तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.



