📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

नाम फाउंडेशनच्या वॉटर एटीएममुळे 12 गावांना स्वच्छ पाण्याचा दिलासा

नाम फाउंडेशनच्या वॉटर एटीएममुळे 12 गावांना स्वच्छ पाण्याचा दिलासा
आष्टी (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि दर्जेदार पिण्याचे पाणी गावातच उपलब्ध व्हावे या उद्देशाने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आष्टी तालुक्यातील 12 गावांमध्ये वॉटर एटीएम उभारण्यात आले आहेत. यासाठी सुमारे 75 लाख रुपये खर्च करण्यात आले असून कारखेल खुर्द, दौलावडगाव, म्हसोबाचीवाडीसह अन्य गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागात विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येते. त्यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असते. अनेक ठिकाणी पाणी गरम करून, माठात साठवून ते नितळ होण्याची वाट पाहावी लागत होती. मात्र गावातच वॉटर एटीएम सुरू झाल्याने नागरिकांना अवघ्या पाच रुपयांत 20 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. नाम फाउंडेशनने ग्रामीण भागातील 56 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये वॉटर फिल्टर एटीएम उभारण्याचा उपक्रम राबवला आहे. त्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना स्वच्छ पाणी सहज उपलब्ध झाल्याने महिलांची, बालकांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. आष्टी तालुका दुष्काळी व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. अनेक गावांमध्ये नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागते. मात्र नाम फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गावातच शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात या यंत्रणांची देखभाल आणि दुरुस्ती सुरळीत व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाममात्र दराने पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
गावातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल नाम फाउंडेशनचे आभार मानले असून, वयोवृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलल्याची भावना व्यक्त केली आहे.
▣ *चौकट*
“ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे ही काळाची गरज आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी व्हावेत आणि सर्वसामान्य कुटुंबांना गावातच दर्जेदार पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नाम फाउंडेशनने वॉटर एटीएमचा उपक्रम राबवला आहे. ज्या गावांमध्ये हे प्रकल्प सुरू झाले आहेत, त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येत असून आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.”
— तानाजी मोहिते, समन्वयक, नाम फाउंडेशन
Back to top button