बीड

बावी शाळेला संगणक भेट : गुणवत्तेची दखल घेत रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम

बावी शाळेला संगणक भेट : गुणवत्तेची दखल घेत रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम

नुतन कार्यकारिणीचा सत्कार; संगणक भेटीबरोबर वृक्षारोपण

जामखेड प्रतिनिधी| शनिवार, २८ जून २०२५
जामखेड शहरात रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी यांच्या स्थापनेनंतर पहिल्या १० दिवसांत जामखेड तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रुपये २५ हजारांचा संगणक भेट दिल्याबद्दल बावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने रोटरी क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांचा शाळेत दिनांक २८ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सत्कार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश कारंडे होते.कार्यक्रमाची सुरवात ज्योतीक्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष अरुण उगले, कोषाध्यक्ष डॉ. सादेख पठाण, पर्यावरण समिती प्रमुख डॉ. भरत देवकर, सार्वजनिक प्रतिमा प्रमुख धनराज पवार, कार्यकारिणी सदस्य आनंद राजगुरू व महेश यादव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सुरेश कारंडे म्हणाले,रोटरी क्लबच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही असे सहकार्य सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत गायकवाड बोलताना म्हणाले की,शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प आमच्या मनात पूर्वीपासूनच होता. इतर शाळांच्या तुलनेत बावी शाळेतील पटसंख्या व शैक्षणिक गुणवत्तेकडे पाहता, या शाळेस संगणक देणे योग्य वाटले, शाळेतील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची गोडी लागेल आणि संगणकीय साक्षरता वाढीस लागेल.

कोषाध्यक्ष डॉ. सादेख पठाण बोलताना म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबत खेळ व शिस्त ही अत्यावश्यक असून याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे.

यावेळी डॉ.भरत देवकर म्हणाले की,माझ्या शिक्षणाची पायाभरणी याच मातीत झाली. आज रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या माध्यमातून गावातील शाळेला संगणक देण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य समजतो. शिक्षण हा विकासाचा खरा पाया आहे, संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक दारं खुली होतील.

यावेळी बावीचे सरपंच राम पवार, ग्रामपंचायत सदस्य महादेव कारंडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपक समुद्र, माजी सरपंच सुनील चिकणे, नितीन शेरे, पालक अमोल पवार व शाळेचे मुख्याध्यापक अमोल पवार, उपाध्यापक योगेश तुपविहीरे, उपाध्यापिका रुबिना पठाण, पदवीधर शिक्षक विशाल जंगाले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अमोल पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन योगेश तुपविहीरे यांनी मानले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

चौकट
*स्थापनेनंतर अवघ्या दहा दिवसांत संगणक देत कौतुकास्पद उपक्रम*

नुकत्याच स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी तर्फे सामाजिक बांधिलकीतून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. स्थापनेनंतर अवघ्या दहा दिवसात क्लबने बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला २५ हजार रुपये किमतीचा संगणक भेट देऊन शैक्षणिक क्षेत्रात भर घातली आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र क्लबचे कौतुक होत आहे.

Back to top button