नागेश घायाळ यांची जामखेड तालुका समादेशक अधिकारीपदी नियुक्ती

नागेश घायाळ यांची जामखेड तालुका समादेशक अधिकारीपदी नियुक्ती
जामखेड प्रतिनिधी –जामखेड येथील होमगार्ड विभागातील निष्ठावान अधिकारी नागेश घायाळ यांची तालुका समादेशक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी दिनांक २६ जून २०२५ रोजी अधिकृतरित्या पदभार स्विकारला असून, त्यांची ही नियुक्ती अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
घायाळ यांनी दिनांक १० सप्टेंबर १९९१ रोजी होमगार्ड संघटनेमध्ये प्रवेश करून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर १ नोव्हेंबर २००४ पासून ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांनी पथकामध्ये अंशकालीन लिपिक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत त्यांना १८ जानेवारी २०१९ रोजी वरिष्ठ पलटन नायकपदी पदोन्नती देण्यात आली होती.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावत होमगार्ड विभागात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी सांगितले की, हा प्रवास जगद्गुरूंच्या वरदहस्तामुळेच शक्य झाला आहे. त्यांच्याच आशीर्वादाने पुढेही समाजसेवेच्या वाटचालीस समर्पित राहीन.
जामखेड तालुक्यातील होमगार्ड पथकाच्या दृष्टीने ही नियुक्ती कार्यक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना अधिकारी व सहकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.



