जामखेड तालुक्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्यासह गायीचा मृत्यू, घर व फळपिकांचे मोठे नुकसान

जामखेड तालुक्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्यासह गायीचा मृत्यू, घर व फळपिकांचे मोठे नुकसान
जामखेड – जामखेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने तुफान झोडप घातली आहे. गुरूवारी रात्री मोहरीत पडलेल्या विजेच्या झटक्यामुळे एका गायीचा मृत्यू झाला, तर महारूळी येथे घरांचे नुकसान झाले. घोडेगाव, चौंडी आणि चोभेवाडी येथील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी संकटात आले आहेत.
राजुरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाड पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने इमारतीला हानी पोहोचली. कांदा, ज्वारी आणि गहू पिके भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. शहरात पहिल्या पावसामुळे अनेक घरात व दुकाने पाण्याखाली गेली, नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले.
बुधवारी झालेल्या पावसामुळे मोहरी येथील शेतकरी सुखदेव नामदेव श्रीरामे यांच्या गायीच्या अंगावर वीज कोसळली यामुळे गायीचा जागीच मृत्यु झाला. तलाठी गागरे यांनी पंचनामा करून तहसील विभागाला अहवाल सादर केला आहे.
दि.२ एप्रिल रोजी गुरूवारी रात्री नऊ ते साडेनऊ च्या सुमारास व शुक्रवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे महारूळी बाळू बाबा मुळे यांच्या घरावर काल वीज पडली यामुळे घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तलाठी अक्षय शिंदे यांनी पंचनामा केला आहे.
याच रात्री चौंडी येथील गणेश जगदाळे यांच्या केळीच्या बागाचे वादळी वाऱ्यासह पावसामुळे ( 0.50 आर) नुकसान झाले.
चौभेवाडी येथील बाळू लक्ष्मण वाळुंजकर यांच्या दोन हेक्टर आंबा पिकांचे नुकसान, लक्ष्मण गणपत वाळुंजकर यांच्या एक एकर आंबा पिकांचे नुकसान झाले, चंपाबाई लक्ष्मण वाळुंजकर यांच्या एक एकर आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. वरील नुकसानीचा पंचनामा तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी केला आहे.
सध्या काही शेतकऱ्यांची गहू, ज्वारी पिकांची काढणी सुरू आहे. तसेच कांदा शेतात आहे. हे भिजून नुकसान झाले. फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचबरोबर शहरात झालेल्या पावसामुळे अनेकांच्या दुकानात व घरात पाणी शिरले यामुळे एकच हाहाकार उडाला होता.
तहसीलदार धनंजय बांगर यांनी नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसेच तहसील कार्यालयात आपतकालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे.



