रस्त्यावर उघड्यावर हॉस्पिटल कचरा; नागरिकांच्या जीवाशी खेळ!

रस्त्यावर उघड्यावर हॉस्पिटल कचरा; नागरिकांच्या जीवाशी खेळ!
प्रशासन गप्प का? दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी
सुहास सावंत / माजलगाव:-माजलगाव शहरात शहरात निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यालगत उघड्यावर टाकलेला हॉस्पिटलचा कचरा पाहून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. औषधांच्या रिकाम्या पेट्या, गोळ्यांचे पाकीट, इंजेक्शनसह विविध वैद्यकीय साहित्य रस्त्यावर फेकून दिल्याने परिसरात संसर्गजन्य आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या मार्गाने शाळकरी मुले, शेतकरी, ग्रामस्थ व रोजंदारी करणारे शेकडो नागरिक ये-जा करतात. उघड्यावर टाकलेल्या या कचऱ्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येत असून, परिसरात फिरणाऱ्या जनावरांनाही संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.
नियमांनुसार हॉस्पिटलचा कचरा सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. तरीही काही हॉस्पिटल्स बेफिकीरपणे कचरा टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नगरपालिका प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन बीड यांनी याची तातडीने चौकशी करून संबंधित हॉस्पिटलचा शोध घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.
यापूर्वीही अनेकदा कचरा व्यवस्थापनात निष्काळजीपणा आढळला आहे. मात्र केवळ आश्वासनांवर थांबण्याऐवजी यावेळी दोषींना चाप लावून परवाना रद्द करण्यापर्यंतची कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी नागरिकांची भूमिका ठाम झाली आहे.
सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा बेपर्वा हॉस्पिटल्सवर प्रशासनाने तातडीने धडक कारवाई केली नाही तर याविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
चौकट
अन्न व औषध प्रशासन बीड जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया लावता आली नाही.



