
सोमनाथवाडीतील अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता !
बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिरसात रंगला सोहळा
लिंबागणेश : (दि.६) बीड तालुक्यातील बालाघाटावरील सद्गुरू ईश्वर बाबा भारती यांच्या पावनभूमीत सोमनाथवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता रविवारी (दि.६) श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान, बेलगावचे मठाधिपती महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
“तुझिये संगती जाली आमुची निश्चिंती; नाही देखिले ते मिळे! भोग सुखाचे सोहळे!” या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओव्यांचा दाखला देत महंत तुकाराम महाराज भारती यांनी सुश्राव्य कीर्तनातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. संतसाहित्याचा आधार घेत भगवंताच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा संदेश दिला.
दि.३१ ते ५ सप्टेंबरदरम्यान आयोजित सप्ताहात ह.भ.प. राजेभाऊ महाराज गवते (बेलुरा), ह.भ.प. अच्युत महाराज घोडके (श्रीगुरु बंकट स्वामी संस्थान, निनगुर), ह.भ.प. महंत महादेव महाराज गिरी (अंतरवाली सराटी), ह.भ.प. गणेश महाराज वारंगे (मादळमोही), ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे (चऱ्हाटा), ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (मठाधिपती, बंकट स्वामी संस्थान निनगुर), ह.भ.प. बबन महाराज मंझरीकर (मंझरी) आदी नामवंत कीर्तनकारांनी विविध विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.
सप्ताहभर हरिजागर, दुपारची प्रवचनसेवा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सांगतेनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तन सोहळ्यास ह.भ.प. महादेव भारती महाराज (बेलेश्वर संस्थान), व्यासपीठ चालक ह.भ.प. नवनाथ महाराज शेळके, मृदंगाचार्य भागवत महाराज चव्हाण, बजरंग महाराज पाहुणे, माऊली महाराज शेळके, जालिंदर महाराज सानप, शहादेव महाराज येडे, पंडित महाराज कदम, मोहन महाराज तावरे, विनोद महाराज वायभट, बबन महाराज इंगोले, किसन महाराज वायभट, भरत फरताडे, विलास फरताडे, चोपदार विठ्ठल महाराज मुळीक, सोमीनाथ महाराज पालखी यांच्यासह समस्त गावकरी व भजनी मंडळी उपस्थित होती.
कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सप्ताहकाळात परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, बद्रीनाथ जटाळ, पालवनचे सरपंच मनोज पवार, दिपक मस्के, शुभम पवार, विशाल पवार, ह.भ.प.अनंतकाका मुळे , गणपत तागड,सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२



