बीड
दुःखाच्या डोंगराखाली कांबळे कुटुंबाला ‘अलकाश्री फाउंडेशन’चा आधार

दुःखाच्या डोंगराखाली कांबळे कुटुंबाला ‘अलकाश्री फाउंडेशन’चा आधार
डॉ. श्रीराम खळगे यांची तत्काळ १० हजारांची मदत; “आम्ही तुमच्या पाठीशी”
माजलगाव / प्रतिनिधी
एकापाठोपाठ मुलगा आणि वडिलांच्या निधनाने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच ‘अलकाश्री फाउंडेशन – एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत तात्काळ मदतीचा हात पुढे करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच डॉ. श्रीराम खळगे यांनी स्वतः कांबळे कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली. दुःखात बुडालेल्या परिवाराशी संवाद साधत त्यांनी कुटुंबीयांना धीर देत “या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत” असा विश्वास दिला.
यावेळी डॉ. खळगे यांनी तत्काळ १०,००० रुपयांची आर्थिक मदत सौ. गंगुबाई रामभाऊ कांबळे यांच्या हाती सुपूर्द केली. अचानक आलेल्या संकटात ही मदत कुटुंबासाठी दिलासा देणारी ठरली. फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जात असून समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याची भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
या सांत्वन भेटीदरम्यान बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया समन्वयक तथा उपाध्यक्ष मा. वी. सुधाकर कांबळे, माजी उपसरपंच तथा ऊसतोड कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल राधे कांबळे, लखन कांबळे, भाऊसाहेब कांबळे, अनिकेत कांबळे, दादा कांबळे, दादा कसबे, गणेश कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, गुड्डू कांबळे, बाळू कांबळे, छोटू कांबळे यांच्यासह गावकरी मंडळी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कांबळे कुटुंबावर आलेल्या दुहेरी आघातामुळे गावात शोककळा पसरली आहे. सामाजिक बांधिलकी जपत संकटसमयी धावून येणाऱ्या ‘अलकाश्री फाउंडेशन’च्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा संवेदनशील प्रसंगी समाजातील सजग नागरिक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे हीच खरी माणुसकी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



