चरकांच्या ज्ञानज्योतीतून आरोग्यसंस्कृतीचा प्रकाश गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे महाविद्यालयात चरक जयंती उत्साहात साजरी

चरकांच्या ज्ञानज्योतीतून आरोग्यसंस्कृतीचा प्रकाश
गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे महाविद्यालयात चरक जयंती उत्साहात साजरी
माजलगाव (प्रतिनिधी):एका प्राचीन ऋषीच्या सिद्ध ज्ञानावर उभा असलेला हजारो वर्षांचा वैद्यक परंपरेचा प्रवास… त्या परंपरेचा आजच्या तरुण पिढीने घेतलेला अभिमानपूर्वक जागर. प. पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे महाविद्यालयात साजऱ्या झालेल्या चरक जयंती विषयी आचार्य चरक –आयुर्वेदाचे मूळ स्तंभ, ज्यांनी आपल्या चरक संहितेच्या माध्यमातून रोगांच्या मुळाशी जाऊन माणसाच्या आरोग्यपूर्ण जीवनाचा विचार मांडला. त्यांच्या या विचारांची आठवण करून देण्यासाठी महाविद्यालयात चरक जयंतीचा कार्यक्रम पार पडला.प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत उपस्थित प्राध्यापक, डॉक्टर, आणि विद्यार्थ्यांनी नतमस्तक होत आपल्या ज्ञानपरंपरेला वंदन केले. त्यानंतर एकेकाळच्या ऋषिपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या चरक संहितेतील श्लोकांचे पठण विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ डॉक्टरांनी आयुर्वेदाची आजच्या युगातील उपयुक्तता उलगडून सांगताना, “चरक हे केवळ वैद्य नव्हते, तर ते आरोग्यदर्शनाचे शास्त्रशिल्पी होते” असे सांगून आयुर्वेदाच्या मूलतत्त्वांवर प्रकाश टाकला.
प्राध्यापकांनीही चरकांचे जीवनकार्य उलगडत विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर होण्यापेक्षा आरोग्यदूत होण्याचे आवाहन केले. “संशोधनाची दिशा भारतीय ज्ञान परंपरेतून घ्या” असे सांगत त्यांना नव्या विचारांची प्रेरणा दिली.कार्यक्रम संपला, पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आयुर्वेदाचे बीज पेरले गेले. एक व्रत – चरकांच्या मार्गावर चालत भारतीय वैद्यकीय परंपरेचा दीप पुन्हा उजळवण्याचे.



